You are currently viewing काँग्रेस जिल्हाध्यक्ष संघटनात्मक बांधणीत एक पाऊल पुढे….

काँग्रेस जिल्हाध्यक्ष संघटनात्मक बांधणीत एक पाऊल पुढे….

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेतृत्व?

राजकीय विशेष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस ही एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर गेली अनेकवर्षं उभी आहे. मध्यंतरीच्या काळात नारायण राणे काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेस जिल्ह्यात एक नंबर वर आली. सर्व सत्तास्थाने काँग्रेस कडे चालून आली. आणि मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी मात्र दीपक केसरकर यांच्या पक्षात्यागामुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. परंतु अलीकडेच नारायण राणे भाजपावासी झाले आणि काँग्रेस पक्षाची वाताहात झाली होती.
विकास सावंत यांनी जिल्हाध्यक्षपद सोडल्यावर काँग्रेस नेतृत्वाने चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करत एक नवा चेहरा जिल्हा काँग्रेसला अध्यक्ष म्हणून दिला. बाळा गावडे यांनी पक्षीय वादविवाद यांच्यात अडकून न राहता पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याकडे लक्ष केंद्रित केले. आगामी ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन गेल्या १६ नोव्हेंबर पासून गावागावात झंझावाती दौरे सुरू केले. अध्यक्ष झाल्यावर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली. दौरे आयोजित करून जनतेच्या जवळ जात त्यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली.
वैभववाडी येथील भरगच्च काँग्रेस मेळाव्यात त्यांनी भविष्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढविण्याचे रणशिंग फुकले. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाळा गावडे यांच्या संघटनात्मक बांधणीच्या कार्यामुळे आणि जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यामुळे जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा एक पाऊल पुढेच चालल्याचे दिसून येत आहे. मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटात जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी अजूनही संघटनात्मक दृष्ट्या प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी मागे पडल्याचे चित्र आहे.
मध्यंतरीच्या काळात पवार कुटुंबियांच्या विश्वासातील पुणे बँकेच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी राष्ट्रवादीची जिल्ह्यात बांधणी करण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन अध्यक्ष सुरेश गवस यांनी देखील त्यांना योग्य साथ दिली होती. परंतु पुढे अर्चना घारे यांना पुणे येथे माघारी बोलाविण्यात आले आणि प्रवीण भोसले व अध्यक्ष सुरेश गवस यांचे सूत न जुळल्याने गवस यांना पायउतार व्हावे लागले. तिथून पुन्हा एकदा राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली. याचाच फायदा राष्ट्रीय काँग्रेसला झाला आणि बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने उभारी घेतली.
बाळा गावडे यांनी जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणत, त्यांची नाराजी दूर करत काँग्रेसची मजबूत बांधणी केली. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत आली, त्यामुळे बाळा गावडे यांच्या प्रयत्नांना बळ मिळाले. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याचे रणशिंग फुंकत बाळा गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येतं आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत येतो की नाही हे भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमधून दिसून येणार आहे. तूर्तास बाळा गावडे यांनी संघटनात्मक बांधणी करून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − two =