शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? असा सवाल अग्रलेखातून शिवसेनेनं केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या ‘नव्या घटना समिती’चा विजय असो! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!, असं म्हणत जहरी टीका भाजपवर केली आहे.
सध्या महाराष्ट्रात ‘ईडी’ प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे ‘ईडी’ प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका ‘महात्म्या’ने ‘ठाकरे सरकार’ पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी ‘ईडी पिडी’च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.