You are currently viewing सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण परिषद मार्फत कोकणचा अभ्यास दौरा

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण परिषद मार्फत कोकणचा अभ्यास दौरा

पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात मोठा वाव – श्रीकांत सावंत.

 

मसुरे प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण परिषदच्यावतीने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यटनाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच रत्नागिरी जिल्हा दौरा करून येथील विविध पर्यटन स्थळांना भेटीगाठी दिल्यात. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्यासाठी तसेच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या दौऱ्याचा मोठा उपयोग होणार असल्याचे श्रीकांत सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण परिषद ही संस्था सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून विविध विकासात्मक तसेच रोजगार निर्मिती करणारी संस्था असून या संस्थेच्या वतीने नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर,श्रीवर्धन या भागातील विविध नर्सरी हाऊस बोट, फेरीबोट, आधुनिक भाजीपाला उत्पन्न, बांबू लागवड, फार्म हाऊस प्रकल्प, वाईनरी प्रकल्प, पितांबरी ऍग्रो टुरिझम, कृषी पर्यटन, होम स्टे इत्यादी प्रकल्पाची पाहणी करून याबाबतची माहिती घेऊन कोकणामध्ये या सर्व प्रकल्पांची गावागावात कशा पद्धतीने निर्मिती करता येईल याबाबत सर्व तज्ञांचे मार्गदर्शन व माहिती जाणून घेतली. कोकण सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रमशील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी व चर्चा विनिमय सुद्धा करण्यात आली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते मंडळी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, शेतकरी यांच्या सुद्धा यावेळी भेटीगाठी घेऊन या चळवळीत या सर्वांना सक्रिय करून घेण्याचे सुद्धा यावेळी ठरविण्यात आले.

यावेळी या टीमने आधुनिक भाजीपाला शेती उत्पादनास भेट, मसाला बाग आणि मसाला पिके लागवड यांची माहिती घेतली. तसेच आंतरपीक नियोजन कसे करतात, विविध जातीचे बांबू लागवड शेती प्रकल्प भेट घेऊन माहिती घेतली. शाश्वत कृषी उद्योग स्थळांना भेटीगाठी, कोकण विकासावर विविध विषयांच्या पर्यटनामध्ये उपयोग करून घेण्याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन, कोकण विकासाचे पर्यटन याबाबत चर्चा विनिमय तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध उद्योग प्रक्रिया ना भेटीगाठी देऊन याबाबत माहिती घेण्यात आली.

कोकणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणण्यासाठी मोठा वाव असून नवनवीन उद्योजकांना तसेच येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी या कोकण दौऱ्याचा मोठा उपयोग होणार असून भविष्यात एक कोकण व्हिजन परिषद घेऊन यामधून कोकणातील बेरोजगारांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांत सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. यापूर्वीसुद्धा कोकणचा व्हिजन घेऊन श्रीकांत सावंत यांनी मोलाची अशी कामगिरी केली आहे. कोकणातील छोटे मोठे शेतकरी छोटे-मोठे उद्योजक तसेच बेरोजगार आणि प्रत्येक युवकांनी या व्हिजनमध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत श्रीकांत सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.

कोकण भेटीगाठी दरम्यान श्रीकांत सावंत आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी उद्योजक दिलीप शिर्के यांचे मोलाचे असे मार्गदर्शन घेतले. रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या माध्यमातून दिलीप शिर्के हे काम करत असून कोकणात अनेक ठिकाणी फार्म हाऊस, बंगले, बिनशेती प्लॉट त्यांचे प्रकल्प सुरू असून रोजगाराच्या अनेक संधी त्यांनी निर्माण केलेले आहेत. तसेच डॉक्टर चंद्रकांत मोकल, सत्यवान दरदेकर, विनायक महाजन, एकनाथ मोरे, अरविंद अमृते, प्रदीप शिर्के, दिलीप शिर्के, माधव महाजन आदी मान्यवरांशी यावेळी चर्चा विनिमय करण्यात आली. यावेळी श्रीकांत सावंत यांच्यासोबत परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा