चाफेड सरपंच किरण मेस्त्री आणि ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
गोवा सरकारच्यावतीने पुरस्कार
देवगड
गोवा सरकार पी डब्लू डी स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. गोवा यांच्या वतीने इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे देवगड तालुक्यातील चाफेड गावचे सरपंच किरण लीलाधर मेस्त्री आणि ग्रामसेवक हनुमंत बाळकृष्ण तेरसे यांना विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदन पत्र हा राष्ट्रीय पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. चाफेड सरपंच किरण मेस्त्री, ग्रामसेवक हनुमंत तेरसे यांच्या विकासकामांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. हा सत्कार सोहळा गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे संपन्न झाला.
या सत्कार सोहळाप्रसंगी चाफेडचे माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, ग्रा. पं. सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर, महेश परब, बाबू घाडी, ग्रामसेवक भिसे , साळगावकर तसेच भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते व मठाधीश उपस्थित होते.