You are currently viewing योग्य करिअर निवडल्यास यशोशिखरावर पोहोचाल – प्रा. राजाराम परब

योग्य करिअर निवडल्यास यशोशिखरावर पोहोचाल – प्रा. राजाराम परब

योग्य करिअर निवडल्यास यशोशिखरावर पोहोचाल – प्रा. राजाराम परब

सावंतवाडी येथे करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न, तालुका पत्रकार संघाचे आयोजन.

सावंतवाडी :p

दहावी म्हणजे विद्यार्थी जीवनाला एक महत्त्वपूर्ण आयाम देणारा टप्पा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावी आणि बारावीचा निकाल हा राज्यात प्रथम आहे. मात्र असे असले तरी बहुतांश विद्यार्थी करिअर निवडताना चुकतात आणि त्याचा फटका जिल्ह्याच्या एकूण गुणवत्तेवर बसतो. त्यामुळे दहावीनंतर योग्य करिअर निवडल्यास यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचता येते असे मत परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा व मोटिवेशनल स्पीकर प्रा. राजाराम परब यांनी येथे व्यक्त केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस प्रशालेत ‘दहावीनंतर करिअरची निवड’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. परब बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार होते. यावेळी व्यासपीठावर परफेक्ट अकॅडेमीचे चेअरमन डॉ. एम.आर. परब संचालिका सौ. अंकिता परब महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर आदी उपस्थित होते.

प्रा. राजाराम परब यांनी यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून दहावी नंतरचे करिअर कसे करावे? याबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. प्रा. परब यांनी विशेषतः दहावीनंतरच्या विज्ञान शाखेतील करिअरच्या निवडीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक गुणवत्ता असतानाही मार्गदर्शन नसल्यामुळे येथील मुलं चांगले करिअर घडविण्यात मागे पडतात. यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांचा झाला विशेष सन्मान –
यावेळी परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार तसेच महेंद्र अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांचा परफेक्ट अकॅडेमीचे चेअरमन डॉ. एम. आर. परब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. अंकिता परब यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या टीमने व परफेक्ट अकॅडेमीचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले

प्रतिक्रिया व्यक्त करा