*लेखक कवी पत्रकार सागर बाणदार लिखित अप्रतिम लेख*
*चैतन्यमय अनुभवाचा साक्षीदार…*
बदलत्या ऋतूचक्रासारखाच आयुष्याचा प्रवास निरंतर चालत असतो.कधीतरी उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होऊन जीव अगदी मेटाकुटीला येतो, तेव्हा कुठूनशी येणारी मंद वा-याची एक झुळूक देखील मनाला आल्हाददायक स्पर्शाने सुखावून टाकते.तर असह्य होणा-या कडाक्याच्या थंडीत उन्हाची ,आगीची धग ही जणू मायेच्या उबीसारखीच मनभर पसरुन राहते आणि ती कधीच संपू नये ,असे वाटत राहते.म्हणूनच कुठलीच गोष्ट टाळता येत नाही, एव्हाना ती काळानुसार स्विकारायला लागणं ,हे देखील जगण्याचं एक अंग असावं.ज्यायोगे परिपूर्ण जगण्याचा अनुभव घेण्याची खाञी असते.सध्या निसर्गाच्या वातावरणातील बदल कदाचित हेच सांगत असावा.सकाळपासून दुपारपर्यंत कडक ऊन अन् दुपारचा प्रहर ओलांडू लागतो तसं ढगाळ वातावरण,सोसाट्याचा वारा ,वीजांचा कडकडाट होऊन अचानक मुसळधार वळीव पावसाची हजेरी लागत आहे.खरंतर ही पावसाच्या ऋतूची चाहूल शेतातल्या पिकांची स्वप्ने मनात साठवणारी तशीच ती मनातल्या कित्येक आठवणींना जागे करत वास्तवाला भिडण्याची मनाला ताकद देत राहते.इतकी या सा-या वातावरणातली जादू किमान एकदा अनुभवल्याशिवाय त्याची जादू अन् मजाही चाखता येत नाही.सा-या सृष्टीला फुल – फळे अन् त्याच्या सुगंधाची लयलूट करत
समृध्द जगण्याची शिकवण देणा-या निसर्गाचे हे ऋण हे कधीच फेडता येत नसले तरी त्याच्याप्रती कायम मनात कृतज्ञतेचा भाव जपणं ,हा देखील देवपुजेतल्या पुज्यभावाइतकाच शाश्वत सुख, समाधान अन् शांतीचा प्रत्यय आणून देत प्रत्यक्षात जगण्याची श्रीमंती साकारत राहते.काही क्षणांपूर्वीच माझ्या घराच्या उंबरठ्यावरुन निसर्गाच्या वातावरणातील हा बदल मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही अन् त्यानिमित्ताने मग् हा सारा शब्दप्रपंच मांडत एका चैतन्यमय अनुभवाचा मला साक्षीदार होता आले.असे मनात साठवून ठेवण्यासारखे क्षण वाट्याला येणं हे देखील भाग्याचेच म्हणावे लागेल.
– सागर बाणदार