You are currently viewing नात्याच्या उंबरठ्यावर

नात्याच्या उंबरठ्यावर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*नात्याच्या उंबरठ्यावर* 

 

जो मुद्दा आपल्याला पटलेला नसतो त्या मुद्यावरून भांडण सुरू होतं खरं पण बघता बघता मूळ मुद्दा बाजूलाच रहातो आणि सगळंच भरकटत जातं. मग आतापर्यंतचा सगळा असंतोष, केलेल्या तडजोडी,चीड जी इतकी वर्ष आतमध्ये खदखदत असते ती एक एक करून बाहेर येते तीही अक्राळविक्राळ रूप धारण करून. एकमेकांना फक्त दुखावलच जात नाही तर बोचकारलं जातं, अगदी घायाळ केलं जातं. त्यातच मग मुलांचे,घराचे,पैशांचे असे सगळेच मुद्दे आगीत तेल टाकायला धावतात.सासू सासऱ्यांचा मुद्दा तर अशावेळी दबा धरून बसलेल्या वाघासारखा नेमक्या क्षणी अंगावर उडी घेतो. एकेक करत सगळ्याच नात्यांची चिरफाड होते.

भांडून झाल्यावर एकप्रकारची शांती मिळायला हवी मनाला ती मिळतच नाही.कारण महत्त्वाचा जो मुद्दा होता तो मूळ मुद्दाच या धुमश्चक्रीत हरवलेला असतो. बहुतेकांना आठवतच नाही की भांडण सुरू व्हायला कारण नेमकं कुठलं होतं;भलेही ते अगदी शुल्लक का असेना पण ते संपायला हवा ना मगच समाधान मिळेल. *याचा अर्थ संसारात सुख हवं असेल तर मुद्द्याला धरून भांडता यायला हव.* हो पण भांडण हवच नाहीतर वीस वर्षे झाली तीस वर्षे झाली तरी ना वादविवाद, न भांडण म्हटल्यावर आळणी होऊन जाईल आयुष्य. आणि मला वाटतं असा कुठला संसार नसेलच. फक्त कधी भांडायचं, कुठे भांडायचं आणि महत्त्वाचं म्हणजे *कुठे थांबायचं* इतकं कळलं की जमलीच भांडणाची कला. काही ठिकाणी नेमकं इथेच दोघांचं चुकतं. भांडणं विकोपाला जातात… इतकी की तिथून परत येणं अशक्य घेऊन बसतं. एकमेकांवर प्रचंड दोषारोप, आतोनात चिखलफेक केलेली असते की ती धुऊन काढणं प्रसंगी अशक्य होऊन बसत. अशीही काही जोडपी बघितली आहेत की त्यांना दोघातलं भांडण दोघात मिटवणंही शेवटी शक्य होत नाही, मग तिसऱ्याची मदत घेतली जाते. दोघातल्या गोष्टी अगदी खाजगी सुद्धा जेव्हा तिसऱ्याला कळतात तेव्हा त्या चौथ्याला, पाचव्याला कळत जातात आणि सगळाच विचका होऊन जातो. कारण फार थोडे लोक असतात ज्यांना दुसऱ्याचं भलं व्हावं अशी इच्छा असते. बाकीचे बरेच लोक मजा बघणारेच असतात.

तिथून सुद्धा परतीचे सगळे मार्ग बंद झालेले नसतात. पण गरज असते त्या दोघांच्या इच्छाशक्तीची. असं नाही की लग्न टिकवून ठेवणं हा एकच उद्देश त्यामागे असावा. आर्थिक, मानसिक, शारीरिक स्थैर्य ही सुद्धा कारणे विचारात घेतलीच पाहिजेत. शिवाय हे लग्न मोडून पुन्हा दुसऱ्या लग्नाचा विचार असेल तर दुसऱ्या वेळी याचीच पुनरावृत्ती होणार नाही कशावरून? त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना इथून पुढे काय करणार याचं स्पष्ट चित्र आणि सोय असली पाहिजे. खास करून जेव्हा आपण दुःखात, उद्विग्नतेत असतो तेव्हा निर्णय घेताना असा विचार करायला हवा की पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर मी याच निर्णयावर ठाम राहीन का किंवा असाच निर्णय घेईन का? यापेक्षा दुसरा बेटर ऑप्शन असू शकतो का? उत्तर नाही असेल तर नमतं घेणं कधीही शहाणपणाचं. तो काही तुमचा पराभव नसतो, उलट तो तुम्ही स्वतःवर आणि परिस्थितीवर मिळवलेला विजयच ठरतो. कारण त्या पुढचा सगळा मार्ग तुमच्यासमोर लक्ख उजळलेला दिसतो ना?… की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे मग हेच तर हवं होतं.

 

ज्यांच्या भांडणाची परिणिती घटस्फोटात होणार असेल ती दहा दहा वीस वीस वर्ष एकत्र राहून होतच नसते. त्यांना पहिल्या एक दोन वर्षातच कळून चुकलेला असतं की आपण एकमेकांसाठी परफेक्ट मॅच नाही आहोत ते. त्यांनी सुद्धा लग्न टिकवायचंच या अट्टाहासापायी नात्याला फरफटत नेणं थांबवलेलच असतं आणि तेच योग्य. या केसेस मध्ये असं काही अगदी जगबुडी झाल्यासारखं तोंड करून सगळं संपल्यासारखं आयुष्य रडत खुडत काढायची काहीही गरज नसते. प्रत्येकालाच आपलं आयुष्य फुलवण्याचा, आनंदाने, सुखाने जगण्याचा अधिकार असतोच आणि त्यासाठी दुसरा बेटर ऑप्शन मिळाला तर तो स्वीकारायचा मार्गही मोकळा असला पाहिजे.

 

कधी कधी अगदी चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम होऊन सुद्धा निर्णय चुकीचे ठरतात, ते मान्य करून नातं तोडलेलच प्रसंगी बरं असतं. स्वतःच्या पसंतीने अर्थातच लव मॅरेज करणाऱ्यांचं लग्न टिकलं नाही तर दोन्हीकडचे लोक अगदी युद्धाच्या तयारीतच एकमेकांवर कुरघोडी करायला बघतात आणि मी म्हणलं नव्हतं तो मुलगा किंवा ती मुलगी तुझ्या लायकीची नव्हती… अशी बरीच मुक्ताफळही उधळली जातात. कुठलं लग्न यशस्वी व्हावं आणि कुठलं अयशस्वी,तेही का कसं याचे कुठलेही नियम किंवा ठोकताळे असूच शकत नाहीत. प्रत्येक लग्न ही एक स्वतंत्र संस्था असते. आम्ही नाही का सहन केलं? आम्ही नाही असं वागलो… मग आमचं काय वाईट झालं? असं म्हणून कोणीही कुणाच्याही गोष्टी दुसऱ्यांवर लादू शकत नाही. आदर्श लग्न, आदर्श जोडी वगैरे गोष्टी फक्त बोलायच्या असतात, तसं तर प्रत्येक लग्नाचे स्वतःचे काही प्लस मायनस मुद्दे असतातच. फक्त काही दिसतात काही दिसून येत नाहीत किंवा लोक दाखवत नाहीत, इतकंच.

कधी कधी योग्य जोडीदार मिळतो. दोघांना नातं फुलवायचं असतं आणि ते फुलतच.

कधीकधी हो नाहीच्या उंबरठ्यावर नातं सारख झुलत असतं. तिथे मात्र दोघांचाही कस लागतो. *बहुसंख्य नाती अशी असतात की तोडायची हिंमत नाही म्हणून पुढे रेटली जातात.* मग तेही करून पहावं. *शेवटी भांडण ही जशी कला आहे तसेच नातं टिकवून ठेवणं हीसुद्धा एक कलाच आहे, ती ज्याला जमली तो सुखी!* खरंय ना?

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा