कसाल- बालमवाडी येथे वीज कोसळल्याने म्हैस ठार…
ओरोस
विजेसह जोरदार कोसळलेल्या पावसात कसाल येथे म्हैशीवर वीज कोसळल्याने शेतकरी गोविंद कावले याचे सुमारे ६० हजार रुपयांचे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी घडली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारी अशाचप्रकारे पाऊस दाखल झाला होता. यावेळी विजेच्या गडगडाटाने सिंधुदुर्गनगरी परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठेका चुकविला होता. याचवेळी दुपारी सुमारे २ वाजून ३० मिनिटांनी कसाल-बालमवाडी येथे राहणारे गोविंद कावले यांच्या घरासमोर बांधून ठेवलेल्या म्हैशीवर विजेचा लोळ कोसळला आणि ही म्हैस जाग्यावरच मृत झाली. यामुळे श्री. कावले यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची बातमी समजतात कसाल सरपंच राजन परब, तलाठी संतोष बांदेकर यांच्यासोबतच ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सावंत आदींसोबत ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. श्री कावले यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर वीज खांब आणि वीज वाहिन्या तुटल्याने विद्युत कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे.