*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तो पाऊस जेव्हा…*
तो पाऊस जेव्हा पहिला पडला होता
भीतीने थरथर जीव गोठला होता..
कुणी सरणावरती गावातील तो गेला
पण पाऊस होता गर्जत खूपच ओला
लाकडे ती ओली जनतेला प्रश्नच पडला
भर पावसात हा सांगा का बरे मेला
न्यावे कसे हो स्मशानातही त्याला
तो रस्ता निसरडा गच्च तो ओला ओला
वैतागून रॅाकेल खूप खूप ते आणले
टाकून पिपे ती लोक तिथे ते शिणले
थकूनी ते सारे किती वेळ हो बसले
ते तिरडीवरती शव तयाचे हसले
जाळू न शकती पहा लाकडे ओली
कशी पहा फजिती माझ्या समोर झाली
कुजबुज किती ती गावामध्ये झाली
ही आठवण माझी भीतीने अर्धी मेली
पाऊस आठवता आठवते हे सारे
ती घरोघरी हो गारठलेली दारे
आम्ही चिमणपाखरे गोठून आईभवती
संपले वय पण गेली नाही भीती
मृत्यूच अटळ तो जरी कितीही म्हटले
पण जागोजागी जराजर्जरी नटले
जगण्याचा सुटला मोह कुणाला सांगा
पाऊस तो येतो टाकीत टाकीत ढांगा..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)