को रे मार्गावरील ४१ गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार! मेगा ब्लॉक चा फटका
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील
फलाट विस्तारिकरणाच्या कामासाठी शुक्रवारपासून ३० मे पर्यंत ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकणमार्गावर धावणाऱ्या विविध गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे. कोकणातून सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या पनवेल व काही गाड्या दादर स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
जलद-एक्सप्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील १० व ११ क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहे. काही तांत्रिक कामांसाठीही ब्लॉक होणार आहेत. सीएसएमटी येथील फलाट विस्तारीकरणाचे काम तसेच सीएसएमटी स्थानकानजीकच्या यार्डामध्ये हाती घेण्यात आलेल्या कामासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करताच गावी येण्याचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.
तब्बल १५ दिवस घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. गर्दीच्या हंगामामुळे चाकरमान्यांनी कोकणमार्गावरून धावणाऱ्या प्रभावित गाड्यांच्या यादीनुसार प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे