You are currently viewing गॅस पाईपलाईनमुळे तोडलेले काँक्रीट गटार त्वरित बांधा : अन्यथा मळगाव घाटीतच करणार आंदोलन

गॅस पाईपलाईनमुळे तोडलेले काँक्रीट गटार त्वरित बांधा : अन्यथा मळगाव घाटीतच करणार आंदोलन

गॅस पाईपलाईनमुळे तोडलेले काँक्रीट गटार त्वरित बांधा : अन्यथा मळगाव घाटीतच करणार आंदोलन

माजी सभापती राजू परब यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा

दरीच्या बाजूने तुटलेले रेलिंग व कठडेदेखील दुरुस्त करण्याची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आलेले पक्के काँक्रीट गटार आता पावसाळा तोंडावर आलेला असताना देखील हे गटार अजूनही बांधण्यात आलेले नाहीत. आठ दिवसात या गटाराचे काम पूर्ण करा अन्यथा मळगाव घाटीतच आंदोलन उग्र छेडण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांनी दिला आहे.

मळगाव घाटीतील पक्के काँक्रीट गटार गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आले आहेत. गेली दोन वर्षे सातत्याने हे काम सुरू आहे. गतवर्षी देखील गटाराचे काम अर्धवट राहिल्याने पावसाच्या पाण्यासोबत माती रस्त्यावर वाहून आल्याने अनेक अपघातांना सामोरे जावे लागले होते. यावर्षी तर पक्के काँक्रीट गटार तोडल्याने व माती तशीच सोडलेली असल्याने पहिल्याच पावसात सर्व माती रस्त्यावर येऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागणार आहे. तर सुस्थितीत असलेला रस्ता देखील गटारे नसल्यामुळे वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सदरचे गॅस पाईपलाईनचे अर्धवट स्थितीतील काम त्वरित पूर्ण करून तोडण्यात आलेले काँक्रीट गटार पूर्ववत करण्यात यावेत, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वीच हे गटार काँक्रीटने बांधण्यात आले होते. मात्र गॅस पाईपलाईनसाठी ते ब्रेकरने तोडण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी देखील तोडण्यात आली. त्यामुळे रस्ता वाहून जाण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.

एकीकडे सावंतवाडी शहरातील खोदण्यात आलेला रस्ता तसेच साईडपट्टी डांबरीकरणाने पूर्ववत केलेली असताना मळगाव घाटी तसेच घाटीच्या खालील गावात असलेली गटार व साईडपट्टी मात्र दुर्लक्षित आहे. त्यामुळे येथे आठ दिवसात सदर गटार पूर्वीप्रमाणेच काँक्रीटने बांधून मिळावेत तसेच साईड पट्टीची ही काँक्रीटनेच डागडूजी करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तसेच याबाबत टाळाटाळ झाल्यास ग्रामस्थांसह मळगाव घाटीतच उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

तुटलेले रेलिंग व कठड्याचीही दुरुस्ती करा

 

मळगाव घाटीत दरीच्या बाजूला असलेले रेलिंग अनेक ठिकाणी तुटले आहे. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी एक दुचाकीस्वार या तुटलेल्या रेलिंगच्या भागातून थेट दरीत कोसळला होता. तर एक कार देखील दरीत कोसळली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रेलिंग तुटले आहे तसेच कठडे कोसळले आहेत ते देखील बांधून घेण्यात यावेत अशी मागणीही राजू परब यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा