*जनसेवा अधिक होण्यासाठी गावागावातील ग्रामदेवतांच्या चरणी नतमस्तक होतोय*
*युवा उद्योजक विशाल परब*
सामाजिक बांधिलकीतून जनसामान्यांच्या सुखदुःखात समरस होण्याचे व्रत घेतलेले युवा उद्योजक विशाल परब यांनी विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशाल परब यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले, त्याचबरोबर त्यांनी अनेक नामांकित कंपन्यांना जिल्ह्यात आणून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी रोजगार महामेळावे घेतले. जुबिन नौटीयाल सारख्या नावाजलेल्या गायकाला सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आणून मनोरंजनाचा खजिना उघडून दिला. त्यामुळे विशाल परब हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, त्यांनी युवा वर्गाच्या हृदयात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच गावागावात त्यांच्या मागे युवकांची ताकद उभी राहताना दिसत आहे.
*श्री गणेशाचा आशीर्वाद आणि युवा वर्गाची ताकद विशाल परब यांच्या पाठीशी*
भाजपाचे युवानेते विशाल परब यांनी शुक्रवारी रेडी येथील स्वयंभू श्रीगणेश मंदिरात जात विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी रेडीचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊलीचे ही दर्शन घेतले. रेडी येथील भेटीदरम्यान त्यांच्या सोबत रेडी सरपंच राणे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ आणि रेडीतील युवा वर्ग आवर्जून उपस्थित होता. अलिकडच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता युवकांची ताकद हीच खऱ्या अर्थाने राजकारण्यांची आधार काठी बनली आहे. आजकाल युवावर्गाचा पाठिंबा हाच राजकीय लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. आपल्या राजकीय आयडॉलसाठी झपाटून काम करणे हे केवळ युवा वर्ग करू शकतो त्यामुळेच विशाल परब बदलत्या राजकीय परिस्थितीत बाजी मारून जातील हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज भासणार नाही.
*सामाजिक बांधिलकी जोपासली तर आत्मिक समाधान मिळते*
उद्योग व्यवसाय हे जीवन जगण्याचे आधारस्तंभ आहेत. परंतु, “उद्योग व्यवसाय सांभाळताना सामाजिक बांधिलकी जोपासली तर आत्मिक समाधान मिळते. जनसेवा अधिक जोमाने करण्यासाठी ग्रामदेवतांचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत. यासाठीच गावागावात भेट देत ग्रामदेवतांच्या चरणी नतमस्तक होत आहे”.. असे सांगत विशाल परब यांनी गावागावात जाऊन गावातील युवकांना हाताशी धरत प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या चरणी लीन होत गावकऱ्यांच्या हृदयाला हात घातला आहे. गावागावातील समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच विशाल परब थांबले नसून गावकऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणजे ग्रामदैवत..! त्याकरिता प्रत्येक गावातील मंदिरांचे जिर्णोद्धार काम असो किंवा नवीन मंदिर उभारणी, विशाल परब सढळहस्ते मदतीचा हात देत सहकार्य करत आहेत. कुणा मंदिराला खडी, डबर, रवाळी असे साहित्य, तर कुठल्या मंदिराला लाखोंची देणगी देखील देत आहेत. त्यामुळे गावागावातील युवा, जाणते लोक युवानेते विशाल परब यांचा दौरा कधी असणार याची वाट पाहत आहेत.
*हृदयात घर करायचे तर पोटाच्या रस्त्याने जावे अन् गावकऱ्यांच्या मनात शिरायचे तर देवाच्या दारातून जावे*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भाग हा ग्रामीण क्षेत्रात येत असून शेती, बागायती हाच मुख्य व्यवसाय. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकांश जनता ही सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेली असून याच परिस्थितीत आपली उपजीविका करत आहे. अशावेळी सरकार कडून मिळणारी तुटपुंजी मदत कमी पडत असल्याने अनेकांवर आरोग्य विषयक अडचणींच्या वेळी आर्थिक आधार शोधण्याची वेळ येते. अशावेळी युवा उद्योजक विशाल परब कित्येकांसाठी देवदूत बनून धावून जात आहेत. अनेकांना आरोग्य उपचारांसाठी मदत, शैक्षणिक मदत देत ते कित्येकांचे तारणहार बनत आहेत. आपल्या चेहऱ्यावर सदैव मंदस्मित आणत ते गावोगाव फिरत आहेत आणि “सामाजिक कार्यकर्ता विशाल परब” ही आपली ओळख गावागावाला करून देत आहेत. भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात जर उतरण्याची संधी मिळाली तर पूर्ण तयारीनिशी लढण्यास सज्ज व्हायचे असेल तर शहर पातळीवर जेवढे आपण कार्यरत असतो तेवढेच ग्रामीण भागात घराघरात पोचणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात कार्यरत राहणे आवश्यक आहे. कोणाच्याही हृदयात शिरायचे असेल तर त्याच्या पोटाच्या मार्गाने जावे लागते..आणि गावकऱ्यांच्या मनात घर करायचे असेल तर देवाच्या दारातून जावे लागते. यासाठी विशाल परब प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेत आहेत. त्यांचे हे प्रयत्न नक्कीच भविष्यात त्यांना यशाचा मार्ग दाखवतील यात तिळमात्र शंका नाही..