शिरवल मध्ये धोकादायक गंजलेले विद्युत पोल पडल्याने नुकसान
गंजलेले विद्युत पोल बदला… अन्यथा घेराव घालणार
ग्रामस्थांचा कार्यकारी अभियंत्यांना ईशारा
कणकवली( प्रतिनिधी)
कणकवली शहरासह हळवल, शिरवल, कळसुली मध्ये काल दुपारी जोरदार वादळ आणि पाऊस कोसळला.
शिरवल गाडेसखलवाडी येथील धोकादायक बनलेले आणि गंजलेले जिर्ण विद्युत खांब वादळामुळे तुटून पडले.सुदैवाने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जिवित हानी झाली नाही.मात्र विज वितरण विभागाचे मोठे नुकसान झाले.
याबाबत शिरवल गाडेसखल वाडीतील ग्रामस्थांनी विज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन विद्युत पोल बदलण्यासाठी निवेदनही दिली होती. मात्र सुशेगाद असलेल्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच हि परीस्थिती निर्माण झाली आहे.अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गंजलेले आणि जिर्ण झालेले धोकादायक पोल तात्काळ बदलावेत .आणि ग्रामस्थांना सुरळीत सेवा द्यावी.अन्यथा कार्यकारी अभियंता यांना घेराव घालून जाब विचारु असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे पोल, विद्युत तारा, घरांवरील पत्रे, रस्त्यावर झाडे पडून रस्ते बंद झाले होते.शेत घरांचे पत्रे वाऱ्याने उडून गेले तर काही पत्रे फुटले होते.हळवल मुख्य मार्गावर देखील झाड पडल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.