You are currently viewing मांडवी खाडीत बुडालेल्या यशचा मृतदेह सापडला…

मांडवी खाडीत बुडालेल्या यशचा मृतदेह सापडला…

मांडवी खाडीत बुडालेल्या यशचा मृतदेह सापडला…

वेंगुर्ले

येथील मांडवी खाडीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह आज पहाटे आढळून आला. यश भरत देऊलकर (वय १६) असे त्याचे नाव आहे. काल तो आणि त्याचा मित्र गौरव राऊळ पोहण्यासाठी खाडीत उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यश हा पात्रात बुडाला होता तर त्याच्या मित्राला वाचविण्यात यश आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, यश हा तळवडा येथे आपल्या मामाकडे आला होता. काल आपल्या मावशीसोबत वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी गेला होता. झुलत्या पूलानजिक असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आरवला नाही. त्यामुळे यश आणि गौरव राऊळ (वय १५) हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छिमार बांधवाने गौरव राऊळ या मुलाला वाचवले. मात्र, यश पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन बुडाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत खाडीमध्ये त्याचा शोध सुरू होता. मात्र तो सापडू शकला नव्हता. दरम्यान आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास यश याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. नातेवाईकांसह पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यश याच्या निधनामुळे देऊलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा