*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*परीक्षा….*
परीक्षा? बाप रे.. परीक्षा? हा शब्दच किती
धडकी भरवणारा आहे, पण कुणाला तरी चुकला आहे का? तुमची तयारी असो वा नसो
ती द्यावीच लागते. तिथे उत्तर नाही व उत्तर माहितही नसतेच.परिणामही माहित नसतात.
ते तडक सामोरे येतात व आपण आवाक होतो.
मी लहाणपणी दिलेल्या शाळेच्या परीक्षा मला
मुळीच आठवत नाहीत. काय पेपर होता व काय उत्तरे लिहिली असतील ते ही आठवत नाही. तरी आले बुवा इथपर्यंत!
संसारात पडल्या नंतर मात्र परीक्षा चांगल्याच
आठवतात, कठोर, जीवघेण्या अशाच! लग्नानंतर धुळ्याला एस वाय बी ए ला ॲडमिशन घेतली. कारण नवऱ्याला जळगांवला नोकरी मिळाली होती.वशिल्याचा
जमाना होता, आहे, राहणार आहे. सत्य आहे.
धुळे कॅालेजला फिजिक्सच्या जागा होत्या. दोन उमेदवार होते. ज्याला जास्त मार्क्स मिळतील त्याला घेऊ असे व्यवस्थापनाने सांगितले. माझ्या नवऱ्याला जास्त मार्क्स असून ॲार्डर दिली नाही, दुसऱ्यालाच दिली.
जेव्हा आम्हाला नोकरीची अत्यंत गरज होती.
जळगांवला जागा होती, तिथे जॅाईन झाले.
नंतर धुळ्याची ॲार्डर मिळाली पण माझ्या
स्वाभिमानी नवऱ्याने ठोकरली व जळगांव गाठले.आमचे लग्न झाले होते, नोकरी नव्हती
मोठा कठिण काळ होता परीक्षेचा ! घरची परिस्थिती बेताची होती, नोकरी मस्ट होती.
पुढच्या वर्षी नाशिकला बरोबरच आलो व जीवनाच्या अनेक परीक्षांना सामोरे जायला
तयार झालो. ह्या आपल्या जीवनातल्या फार
छोट्या परीक्षा हो..
पण काहींच्या जीवनात फार भयंकर परीक्षा
येतात व त्या टाळताच येत नाही त्याचे काय ? माझ्याकडे काम करणाऱ्या बाईंचा नवरा अत्यंत दारूडा.. एकच लहान मुल घेऊन कंटाळून वेगळी राहू लागली तर रस्त्यात गाठून
रस्त्यात मारायचा. रात्री बेरात्री धुमाकूळ
घालायचा गल्लीत.कष्ट करून पोट भरायचे म्हटले तरी जगू द्यायचे नाही ही कसली जीवघेणी परीक्षा हो? कसे जगायचे हो अशा
बायकांनी ? मुलांवर कसे संस्कार करायचे?
पोटासाठी चार घरी काम करतांना मुलाची होणारी फरपट तिने कोणाला सांगायची? आपली गत तर “नित मरे त्याला कोण रडे”
अशी आहे. अशी परीक्षा हजारो बायकांना दररोज द्यावी लागते त्यांचा वाली कोण? अनुत्तरीत आहेत हे प्रश्न ? कोणी सोडवायचे ते? कुणाचीच जबाबदारी नाही का? तिला दैवानेच सोडवले. अती दारूने रक्त ओकून मेला तो. कष्टकरी बायकांच्या नवऱ्यांची सगळ्यांची जवळजवळ हीच स्थिती आहे. तसेच दिवस काढत जगतात बिचाऱ्या ! काय
करतील?
ह्या परीक्षा पुराण काळातील स्त्रियांनाही चुकल्या नाहीत व आताही विज्ञान काळातही
चुकत नाहीत. प्रश्नांचे स्वरूप फक्त बदलले..
परीक्षा बायकांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत.सीतेची अग्निपरीक्षा, वनवास, राजवाडा
सोडून रानावनात बालसंगोपन.. राम राम ..
किती कठोर होत्या हो या परीक्षा.. आणि शेवटी नशिबात काय? जमिन दुभंगून शेवट.
वाह रे दैवा..? किती दु:ख द्यावेस एखाद्याला
याची सीमा आहे की नाही? तीच गोष्ट कुंती
माद्री गांधारी, कर्ण, विदुर,आणि द्रौपदीची!
ती तर होरपळून निघाली या साऱ्यातून. काडीचे
सुख मिळाले नाही.नको ते अग्निदिव्य वाट्याला आले इतकी कठोर नियती. राज्ञीपणाचे सुख ही मिळाले नाहीच व पाच
पुत्र गमावण्याचे दु:ख पदरी पडले ते ही कृष्ण
सखी कृष्णा म्हणवणाऱ्या द्रौपदीच्या वाट्याला!
म्हणून म्हणते, खुद्द देवावतार असलेल्या या
विभुतींना चुकले नाही, राम कृष्णही त्यातून
सुटले नाही, कौसल्या, दशरथ, भरत, उर्मिला
सारेच यात भरडून निघाले, आपण तर सामान्य
माणसे! या कठोर परीक्षा देत देतच आयुष्याची
नौका पार करावी लागते हे कठोर सत्य आहे.
लढत लढत जगण्यात मजा असते बोलायला
सोपे असले तरी निभवायला कठोर असते ना?
जो त्या दिव्यातून जातो त्यालाच ते माहित असते.
परीक्षाच नसतील तर मात्र जगण्याचा उन्मादही
नसेल हे ही खरे आहे. लढून झगडून मिळालेल्या यशाचा मनात अभिमान असतो.काही तरी मिळाल्याचे समाधानही असते. अरे.. इतक्या अडचणी आल्या पण मी
हरलो नाही . मी हे केलेच ! हे समाधानच जगण्याचे बळ देते. मीठा शिवाय जेवणाला चव नाही तद्वत संकटांशिवाय जीवनाला अर्थ
येत नाही हे जरी खरे असले तरी ह्या परीक्षा
जीवघेण्या नसाव्यात एवढीच अपेक्षा आपण
ठेवू शकतो. इच्छा असो वा नसो, परीक्षेला सामोरे तर जावेच लागणार हे त्रिकालाबाधित
सत्य आहे. तुम्ही पण खूप परीक्षा दिल्या असतीलंच.. प्रश्नच नाही, अहो इथे कुणाचीच
सुटका नाही हो…अगदी भिष्माची सुद्धा!
बरंय् मंडळी.. धन्यवाद
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक.
(९७६३६०५६४२)