You are currently viewing पंतप्रधानांच्या दौऱ्या वेळी काढलेला हायमास्ट मनोरा धूळखात –  महेश कांदळगावकर

पंतप्रधानांच्या दौऱ्या वेळी काढलेला हायमास्ट मनोरा धूळखात –  महेश कांदळगावकर

पंतप्रधानांच्या दौऱ्या वेळी काढलेला हायमास्ट मनोरा धूळखात –
महेश कांदळगावकर

पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

मालवण

नौदल दिनाच्या निमित्ताने येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावरील हायमास्ट मनोरा काढून ठेवण्यात आला. मात्र दौऱ्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी पालिका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत हा हायमास्ट मनोरा पुन्हा उभारण्याची कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी पालिकेच्या स्थावर, जंगम मालमत्तेचे नुकसान झालेच आहे. आता यात हायमास्ट मनोऱ्याची भर पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन हा हायमास्ट मनोरा केव्हा उभारणार असा प्रश्न माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, शहरात टोपीवाला हायस्कूलच्या मालकीचे बोर्डिंग मैदान आहे. या ठिकाणी क्रिकेटचे मैदान आहे. पण त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी चालण्याच्या व्यायामासाठी ज्येष्ठ नागरिक, मुले येत असतात. त्यामुळे या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा या उद्देशाने टोपीवाला हायस्कूलच्या मागणीनुसार आमच्या पालिकेच्या कालावधीत हायमास्ट मनोरा बसवण्यात आला. चार डिसेंबरला तारकर्ली येथे नौदल दिन आयोजित करण्यात आला होता. या दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणात येणार होते. यासाठी त्यांचे आगमन होण्याच्या बोर्डिंग मैदानाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर लँडिंगला अडथळा होणारा हायमास्ट मनोरा मालवण पालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवला होता. पंतप्रधानांचा दौरा होऊन आता जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होत आला आहे. मात्र अद्यापही तो हायमास्ट पुन्हा उभारण्याची कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून झालेली नाही. सुमारे सात लाख खर्च करून बसविण्यात आलेला हायमास्ट मनोरा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे बोर्डिंग मैदानावर सध्या धुळखात जमिनीवर पडला आहे.

पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्या अगोदर हा हायमास्ट मनोरा पुन्हा उभारण्याची गरज आहे अन्यथा तो खराब होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कालावधीत प्रशासकाच्या अशाच दिरंगाईमुळे खतमशीन, बायो टॉयलेट गाड्या, पिंपळपार येथील रंगीत कारंजा व्यापारी गाडी अशा स्थावर आणि जंगम मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात आता या हायमास्ट मनोऱ्याची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही कांदळगावकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा