You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गाव कापडणे…*

 

खूप लहान होते मी, वडीलांबरोबर नदी काठी

आमचे खळे होते वडाच्या झाडाखाली. भला मोठा प्रचंड वड आहे तो.लाल टेंभरांनी व पक्ष्यांनी बहरलेला असे कायम.फांद्या अगदी

जमिनी पर्यंत आलेल्या. त्यांच्यावरून सरळ वडावर चढावे इतक्या खाली.जवळच बसायला एक खाट टाकलेली असे.तिच्यावरून मी सरळ वडावर जाऊन बसत

असे, चांगल्या जाड लाकडावर.आरामात पाय हलवत बसायचे. जवळच सालदाराची पायत

चालत असे.कधी ज्वारी बाजरीची कणसे, तर

कधी गव्हाच्या लोंब्या असत. बैल खुंट्या भोवती गरगर गरगर फिरत व त्यांच्या पायाखाली कणसे चुरडली जात व त्यातून दाणे बाहेर पडत त्याचा ढीग होत असे.

 

मग वारा सुटला की वाऱ्याची दिशा पाहून

तिपई सारखी मोठ्ठी लाकडी तिपई उभे राहण्या

साठी आपल्या उंच बाकड्या सारखी असे तिच्यावर सालदार उभा राही व पाटीत धान्य

घेऊन थोडे थोडे खाली सोडतांना वाऱ्याच्या

झोताने कचरा उडून दाणे एकाजागी पडत त्याचा ढीग तयार होई. याला उपणने असे म्हणतात.स्वच्छ असे ते मोतीदाणे फार सुंदर दिसत.पूर्वी मशिन्स नव्हते, डायरेक्ट

पोते भरत नव्हते. तो ढीग झाला की खराट्याने

बाजुचा कचरा दूर लोटत पोती भरली जात.

 

पण तत्पूर्वी गावातल्या बारा बलुतेदारांना खबर

मिळे की भाऊंची ज्वारी काढणे चालू आहे खळ्यात. मग एक एक बलुतेदार दबकत दबकत हळू हळू खळ्यात येऊन बाजुला उभा राही. ढिगाजवळ पायली शेराची मापे असतंच.

मग वडील त्याला नावाने हाक मारायचे. मग तो

आपल्याजवळचे कापड ढिगाजवळ अंथरायचा. आणि वडील मग मापाने त्यात धान्य टाकायचे.बघा, धान्य निघाल्यावर आधी

पहिला मान पक्ष्यांचा, कणसातच दाणे खाण्याचा नि खळ्यात बलुतेदाराचा

कारण हे गावाचे बारा बलुतेदार वर्षभर शेतकऱ्याला त्यांची सेवा देत असत. सुतार शेतीची सगळी अवजारे नांगर वख्खर बैलगाडीची चाके अशी सारी अवजारे देणे, दुरूस्त करून देणे आदी कामे करत असे.

चर्मकार बैलांना लागणाऱ्या गोष्टी, चप्पल बूट

आदी सेवा पुरवत असे व दोन्ही हंगामात खरीप

व रब्बी, खळ्यात येऊन धान्यरूपात आपला मोबदला ही मंडळी खळ्यातूनच घेऊन जात असत.कुंभार सुद्धा गाडगी मडकी पणत्या गार

पाण्याचे मटके सारे देत असे व धान्य घेऊन जात असे. बघा, कशी सेवा व किती विश्वास

होता एकमेकांवर.हे बारा बलुतेदार गावाचा कणा होते. तेच सारा गावाचा व्यवहार बिनबोभाट चालवत असत.

 

मी सहा सात वर्षांची असतांना आमच्या चर्मकाराच्या घरी

जात असे व पटकन चपला द्या म्हणून त्याच्याकडे तगादा लावत असे. तासंतास मी त्यांच्या ओट्यावर खेळत असे ते आता ही मला

डोळ्यांसमोर दिसते आहे.ते ही माझी विचारपूस करायचे, गप्पा मारायचे, मी शेवटी

भाऊंची मुलगी होते ना? भर दुपारी कसा मजेत

माझा वेळ जात असे. वडील म्हणायचे, ऊन आहे, डोक्यावर टॅावेल घेऊन जा. मग डोक्यावर टॅावेल घ्यायचा, बोरसे गल्ली जवळून बोळातून आधी टपाल असेल तर ते

पोष्टात टाकायचे व मग चर्मकाराच्या ओट्यावरून खेळायचे असा प्रोग्राम असे.जवळच धोब्याचे घर होते. वडीलांचे इस्त्रीचे कपडे तिथेच असत. धुवून इस्त्री करून

येत.त्यांच्या घराच्या ओट्यावरच मोठमोठे दगड होते. तिथेच ते आपटून आपटून कपडे धुवत असत.धोबी घरी येऊन कपडे घेऊन जात

असे व आणूनही देत असे. न्हावी घरी येऊन वडीलांची दाढी कटींग करत असेच पण दिवाळीत भल्या पहाटेस येऊन अभ्यंगस्नानासाठी उठवत असे अशी ही प्रथा

होती.बघा, किती मुरलेले होते हे बारा बलुतेदार

गावाच्या सामाजिक जीवनात!

न्हाव्याचा आणखी एक मोठा रोल लग्नात असे.

 

लग्नाच्या जेवणाचे निमंत्रण न्हावीच घरोघर

जाऊन देत असे.”बैन, आज भाऊन् घरनं चुलाले

निवतं से बरं” म्हणजे घरी चूल बंद असा त्याचा अर्थ. दामेंडा पाडाले चला व बहिनिसोन!

अंगणात हळद असे, तिचे निमंत्रण तोच घरोघर

देणार.” हायद लावाले चाला, भाऊंन् घर. तोच

पाटं मांडणार, तांबे ठेवणार, सुत गुंडाळणार,

गोड तोंड करायला गुळ पण तोच वाटणार,”

गुई ना खडा ल्या व माय” म्हणत प्रत्येकाच्या

हातावर गुळ ठेवणार.मग पुन्हा लग्नाची निमंत्रणे देत फिरणार, चला हो, टाई लावाले

चला बरं भाऊन घर”! लग्नविधी चालू असतांना

त्याची बाजुला उपस्थिती आवश्यकच! हे आणा ते ठेवा, सारी कामे चट चट करणार!

पारावर शेवंती निघते तेव्हा रूखवत डोक्यावर

घेऊन तोच बरोबर जाणार..अशी लग्नात ढीगभर कामे न्हाव्याला असतात.सर्वत्र त्याचा

संचार असतो.खेड्यात बोलावणे गेल्या शिवाय

कुणीही जेवायला येत नाही.मानाने येतात, मानाने जातात. शहरासारखी बजबजपुरी नाही.

की, खुर्च्या पकडून लाजिरवाणे अधाशी उभे राहणे नाही. मला तर या प्रकाराची अत्यंत शिसारी आली आहे. कधी जेवण मिळाले नाही

असे लोक जेवणाऱ्याच्या खुर्चीमागे तो जेवत

असतांना कधी उठेल याची वाट बघत उभे राहतात.मला वडील लहाणपणी बोट धरून

पंगतीत जेवायला घेऊन जात. न्हावी बोलवून

गेल्यावर हळूच मंडळी घराबाहेर पडत. यजमानाच्या घरी ओट्यावर सतरंजीवर बसत.

पंगतीत पट्ट्या व रांगोळ्यांची नळी फिरली की

यजमान सन्मानाने म्हणत,”बठा हो जेवाले आते”. मग मंडळी बसत. सर्व वाढून होई पर्यंत

शांत. भाताचे आळे करून पिवळे धम्मक घट्ट

वरण व तुपाची वाढी फिरली की, “वदनी कवळचा एकमुखी गजर होऊन” जयजय रघुवीर समर्थ म्हणताच मग चला हो करा सुरू

जेवण म्हटल्यावरच हात पुढे सरसावत व

मंजळी गरमागरम पुरी व घट्ट वरणाचा आस्वाद घेत चमचमीत उसळीचा भुरका मारत

बुंदीचा बोकाणा भरत असत. वाह वा.. काय ती

पुरी, काय ते घरच्या डाळीचे वरण, अहा… तोंडाला पाणी सुटते हो. उसळ व वांगे बटाटे

रस्सा.. अहाहा.. भाताचे आळे मोडून वरण भात व भाजी कुस्करून घास घेताच स्वर्ग दोन बोटेच हो.. मनसोक्त आडवा हात मारून मंडळी

उठली की मग नऊवारीतल्या बायकांची लाजत

मुरकत पंगत बसे.. गेले हो ते दिवस गेले…!

 

कुठे ते खेड्यातले मानाचे बोलावणे व कुठे हे खुर्चीमागे उभे राहणे! अरे रे..! किती घसरलोत

ना आपण? अन्न कधी पाहिले नाही असे ढिग

वाढून घेतो नि अर्धे टाकून देतो. कसलाही संकोच नाही, लाज नाही, उपाशी राहणाऱ्यांची

कदर नाही, कुठे चाललो आहोत आपण?संस्कृतीचा ऱ्हास म्हणतात तो हाच का? किती

चांगल्या प्रथा होत्या लग्नाच्या! शांतपणे, मजेत मानाने सर्व गोष्टी होत असत. आता शहरात एक दिवसाचे लग्न म्हणजे हुलकावणी

व शो बिझिनेस झाला आहे.तद्दन बाजारू! ना महुर्त आहे ना पाळण्याची गरज आहे. दारू पिऊन तासंतास डि जे वर नवरदेवासह सारे नाचणार..मुहुर्त गेला उडत. इकडे मंगलाष्टके होतात इकडे पंगती उठतात. ना शिस्त आहे ना

सोयरसुतक! वा रे लग्न ? मला तर हसावे की

रडावे तेच कळत नाही व काय करावे हे ही उमजत नाही.

 

बरंय् मंडळी.. आभारी आहे. भेटू पुढच्या रविवारी..

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

॥ कालाय तस्मै नम: ॥

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा