पुणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आयोजित केलेल्या पर्यावरणासाठी अनुकूल गणेशविसर्जन अभियानात स्वरूपवर्धिनी आणि अन्य ढोल पथकातील तरुणाईने सहभाग घेतला.
पुणे महापालिका परिसरातील ७ क्षेत्रिय कार्यालयातील ७२ मूर्ती संकलन केंद्रावर आणि ८ फिरत्या हौदावर गणेशमूर्तींचे विसर्जन, मूर्ती संकलन, अमोनियम बायकार्बोनेट पावडर वाटप, निर्माल्य गोळा करणे, आदी कामाकरिता ढोल पथकातील युवक-युवतींनी उत्साहाने मदत केली.
यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे अनंत चतुर्दशीला ढोल-ताशा पथके, मिरवणूका नव्हत्या. पण सामाजिक जबाबदारीने पथकातील तरुणाईने स्वरूपवर्धिनीच्या माध्यमातून कोरोना हॉटस्पॉट असलेल्या प्रभागातील वस्तीत जाऊन, योग्य सुरक्षा घेत पर्यावरणास अनुकूल गणेश विसर्जन अभियानात उत्साहाने काम केले. या अभियानात रमणबाग, श्रीराम पथक, ज्ञान प्रबोधनी आणि अन्य १२ पथकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या अभिनयाचे नियोजन व अंमलबजावणी स्वरूपवर्धिनीचे अशोक इंगवले, प्रशांत तांबे, अमोल शेलार, राहुल पायगुडे यांनी केले.