मळगाव झिरंग येथे आठ ते दहा एकर आंबा व काजू बागायती जळून भस्मसात
फळांनी बहरलेली कलमे जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल
सावंतवाडी
मळगाव झिरंग येथे रेल्वे ट्रॅक लगत असलेल्या आंबा व काजू बागायतीला आग लागल्याने या वणव्यात सुमारे आठ ते दहा एकर बागायती जळून खाक झाली. विशेष म्हणजे आंबा व काजू फळांनी बहरलेली बागायती डोळ्यादेखत भस्मसात झाल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले. या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मळगाव सावळवाडा लगत असलेल्या झिरंग परिसरात कोकण रेल्वेच्या ट्रॅकलगत असलेल्या बागायतीला बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. दुपारची वेळ असल्याने तसेच वाऱ्यामुळे आग लगेच पसरली व गवत वाळलेले असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. हा हा म्हणता आगीचा वणवा आठ ते दहा एकर क्षेत्रात पसरला.
याबाबतची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून तेथील शेतकरी पांडुरंग हळदणकर यांनी माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांना याबाबतची माहिती दिली. गणेश पेडणेकर यांनी सावंतवाडी नगर परिषदेचा बंब मागविला. बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यास काही प्रमाणात यश आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर, भाजपचे शक्ति केंद्रप्रमुख बाळा बुगडे, पांडुरंग हळदणकर, रुपेश सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी सहकार्य केले.

या आगीत सुमारे आठ ते दहा एकर क्षेत्रातील आंबा व काजू बागायती जळून खाक झाली. विशेष म्हणजे आंबे व काजू लागवडीला आलेले असतानाच ही आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. २००८ मध्ये याच भागात अशाच प्रकारे मोठा वणवा लागला होता. त्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज घडली.
आजच्या आगीच्या घटनेतही सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात भानुप्रिया तळकटकर, विश्राम तळकटकर, अनिल तळकटकर,बाबू पेडणेकर,प्रकाश पेडणेकर, चंद्रकांत पेडणेकर, संदेश हरमलकर, बाळा हरमलकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करून प्रशासनाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.
रेल्वेतून कोणीतरी माचिसची काडी, विडी, सिगारेट अथवा तत्सम अग्निजन्य पदार्थ टाकल्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर वारंवार अशा घटना होत असून याबाबत कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व नवीन कलमे देखील शेतकऱ्यांना देण्यात यावीत अशी मागणी माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांनी केली आहे.