*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*ऋतुराज वसंत*
आपल्या मोहक सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ पाडणारा हा वसंत म्हणजे रसरसते लावण्य… चिरतरुण यौवन..
ऋतुराज वसंताचं आगमन झालं की साऱ्या निसर्गाला जणू आनंदाचं भरतं येते. चराचर सृष्टी हर्षोल्हासानं गाऊ लागते आणि आपल्या मनातही आपसूक गाणं उमलत जातं..
आपल्या जीवनातही अलवारपणे विरघळणा-या या वसंताने अभिजात संगीतात राजेपद ही प्राप्त केलंय बरं…!
वसंत ऋतू येतो तोच मुळी झाडाच्या शेंड्यांवर नाचत- नाचत…! आकाश स्वच्छ, नीरभ्र दिसू लागते.. लहान मोठे मेघ क्षितीजांच्या कडांशी दडी मारून बसतात..
रमणीय पहाट.! त्याबरोबर भ्रमरांची रुणझुण, कोकीळेचा मधुर स्वर..
आपल्या सुरेल स्वरात आंब्याच्या झाडावर बसून ती आपल्या सख्याला साद घालते आणि तिच्या सादेला प्रतिसाद देणारा तो आणि मृदू पर्णांची सळसळ हे सारे एकवटल्याचा भास होतो.. आंब्याची पानं–नाजूकसाजूक पालवी अंजिरी रंगाने न्हाऊन निघते…अशोकाची पाने लवलवतात तर आम्रवृक्षाचा मोहर विकसतो.. नवममल्लिकेची शुभ्र फुले हसू लागतात आणि नील कमळे पाण्यातल्या पाण्यात नाचू लागतात.. बगळ्यांचे शुभ्र थवे इकडून तिकडे उडताना दिसतात.. क्षितीजांच्या कडाशी दडलेली
सायंकालीन मेघ सुवर्णपुष्पे उधळू लागतात आणि त्या सुवर्ण पुष्पांना लालचावलेल्या पाण्यातल्या जलदेवता भूपृष्ठावर येताना त्यांच्या वस्त्रांची होणारी फडफड आणि त्या वस्त्रांना बिलगून आलेला सुगंधी व सुखद असा वारा साऱ्या आसमंतात दशदिशांत पसरतो आणि आपल्या प्रिय सख्यांचे स्वागत करण्यासाठी की काय चंद्रमा घाईघाईने पूर्वदिशेला डोकावतो… सारी सृष्टी चांदण्यात न्हाऊन निघाल्याने ती प्रसन्न आणि
मनमोहक दिसते..! त्याचबरोबर मोहरलेला आंबा, फुललेला पळस, बहरलेला गुलमोहर, पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजलेला चाफा, शाल्मली , दाही दिशांत सुगंध उधळणारा मोगरा आपल्या सुवासाने धुंद करून सोडणारा कुंदा, लाजून लाल झालेला जास्वंद, दबकून उभी असणारी मखमल व पिवळ्या फुलांनी डवरलेली शेवंती, राजाच्या तोऱ्यात दिमाखात फुलणारा गुलाब
अशी फुलझाडे इतकचं नाही तर लडिवाळपणे आपल्या बाळांना कडेवर घेऊन उभा असणारा व कुटुंब वत्सल भासणारा फणस, काजू
झुडपातून डोकावणारी करवंदे ,
टरबूज, कोवळ्या काकड्या, चिंचा, झाडांच्या पानापानांतून डोकावणाऱ्या हिरव्याकंच कैऱ्या, कलिंगड अशा रसदार फळांचा हंगाम म्हणजेच वसंत… !
सृष्टीची ही विविध रुपे पाहून मन अगदी मोहून जाते पण याच बरोबरच सुरु होणारा कडक उन्हाळा जीवाची काहिली करून सोडणारा..! जीवाची काहिली करून सोडणा-या या उन्हातही बहरलेला गुलमोहर, पळस आपल्या सुंदर फुलांचा गालिचा सृष्टीवर अंथरतो…!
पानगळ सोसूनही फुलझाडांचे जोमाने बहरणे आपल्या मनाला आणि डोळ्याला थंडावा देऊन तर जातोच पण छान जगण्याची आशा ही पल्लवित करतो…!
मोगऱ्याचे सुगंधित करून फुलणे, जाईजुईचे वाकुल्या दाखवत साद घालणे, फुलाचे वाऱ्याबरोबर डोलणे या सगळ्यांमुळे निसर्गाचे नव –
पालविणे, पल्लवित होणे मनाला एक वेगळीच तृप्तता देऊन जाते हे नक्कीच…!
सृष्टी वसंतोत्सव साजरा करते व निसर्गाचे लावण्य अनोखी वाटते म्हणूनच की काय पौराणिक कथेत वसंताला कामदेवाचा पुत्र म्हटले आहे
वसंत ऋतूत सृष्टीचा कायापालट करण्याचे, चैतन्य निर्माण करण्याचे, जगण्याला नवी उमेद देण्याचे जेवढे सामर्थ्य आहे ना तेवढेच सामर्थ्य “‘वसंत'” नावाच्या बहुसंख्य मंडळींमध्येही आढळून आलेले आहे बरं…! सर्वच पशुपक्षी, प्राणी आणि वनस्पती तसेच माणसांसाठी सुद्धा वसंत म्हणजे पर्वणी नाही का..?
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी— ठाणे@
9870451020