You are currently viewing आमचे घर म्हणजे न्यायालयच..

आमचे घर म्हणजे न्यायालयच..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गाव कापडणे…*

     (आमचे घर म्हणजे न्यायालयच)..

 

माझे वडील असे पर्यंत गावाला न्यायालयाची

गरज भासलीच नाही.

मुळात आम्ही चौठ्याच्या घरातच रहात होतो.समोर पाच रस्ते होते व मोठ्ठे पटांगण आहे.माझ्या बहिणीचे लग्न ह्याच पटांगणात झाले.(ते नंतर सांगणारच आहे).

गावाचे सर्व निर्णय एक मुखाने वडीलांच्या तोंडूनच होत असत. मी खूप लहान असतांना

एकदा बोरसे गल्लीतून खूप माणसे गोळा झाली नि बघता बघता चौठा माणसांनी भरून

गेला.मला काहीच समजले नाही इतकी मी लहान होते पण ती गर्दी अजून डोळ्यांसमोर

दिसते.अर्थात, प्रकरण कितीही मोठे व असामी

कितीही मोठी असली तरी निवाडा ओट्यावरूनच होत असे. तसा निवाडा झाला व कलकल करत जमाव घरोघर निघून गेला ते मला आता ही डोळ्यांसमोर दिसते आहे.असेच एकदा चोरी प्रकरण झाले होते. न्हाव्याच्या पोराने काहीतरी चोरी केली होती नि त्याला अप्पांसमोर उभे करत जमाव न्याया

साठी थांबला होता. अप्पांनी दोन्ही बाजू ऐकून

घेतल्या. गुन्हा सिद्ध झाला होता व आता शिक्षेची अंमलबजावणी आमच्या ओट्यावरच

झाली होती. चोरी करणाऱ्या मुलाला ओल्या

दोरखंडाने बांधून आमच्या ओट्यावरच शिक्षेची

अंमलबजावणी झाली. मी घाबरत घाबरत घरातून बघत होते व मला त्याला बांधलेले पाहून रडू येत होते. त्या वेळी गुन्हा वगैरे समजण्याचे माझे वय नव्हते.असं काही दिसलं की मला त्याचा खूप त्रास होत होता.असे सर्व प्रकारचे खटले कज्जे आमच्या अंगणात निकाली निघत असत.असेच आमच्या शेजारी चुलत भावाची ४/५ वर्षाची मुलगी मी जिच्याशी खेळत असे व ती मला खूप आवडत असे, ती माहित नाही कशाने वारली तेव्हाही मी एकटीच तिच्या जवळ स्फंदून स्फुंदून रडत उभी होती तेव्हा माझा मोठा भाऊ मला रागावून घरी घेऊन गेल्याचे आठवते.

 

माझ्या वडीलांना भीती हा शब्दच माहित नव्हता. कदाचित गरिबीत गेलेले बालपण व

नंतर क्रांतिकार्य अशी त्यांची घडण झाल्यामुळे

असेल रात्री दोन वाजताही बॅटरी घेऊन ते पांढरीत गेले की चोर त्यांना पाहून पळून जात

असत. गावात भिल्ल लोक दारू पाडत असत.

भिल्लांचा तो पारंपारिक व्यवसायच. किती ही

त्यांचे दारूचे पिंप फेकले तरी ते पुन्हा पुन्हा दारू पाडत असत.वडील अचानक धाड टाकत

मग त्यांची पळापळ होई पण पुन्हा ये रे माझ्या

मागल्या, कारण काही अट्टल दारूड्यांची डिमांड रोजच असे. कमी श्रमात पैसा मिळायचा तो कोण सोडेल ? माझा मोठा भाऊ

पण अचानक धाड टाकून त्यांची दाणादाण करत असे, पण जित्याची खोड मेल्या शिवाय

कधी जाते का ? लपत छपत त्यांचे काम चालूच असायचे. बिडी पिणाराही वडीलांसमोर

कधी बिडी पित नसे. बायका तर भाऊ दिसताच

बाजूला चप्पल हातात पाठी मागे लपवून उभ्या

रहात व वडील गेल्यावरच मार्गस्थ होत असत

एवढा आदर सन्मान वडीलांना गावात मिळत असे. माझे वडील म्हणजे गावचा मोठा संरक्षक

“ वड” होता. वड गेला नि गाव सैरभैर झाले, गावाचा देवच हरवला जणू…!

 

कधी कधी गल्लीतले गावातले लोक असे अडचणीचे प्रसंग आणत की भाऊंना त्या अवैध

प्रकरणातूनही लोकांची सुटका करावी लागत

असे. आपल्या कडे पुरूष मंडळींची अशी अवैध (अंगवस्त्रे)प्रकरणे शेतात खूप चालतात.

एकदा भिल्ल समाज कुऱ्हाडी घेऊन आमच्याच

शेजारच्या घराजवळ, चवताळून चालून आला व त्या विशिष्ट व्यक्तिला शोधू लागला तेव्हा

आमच्याच धाब्यावरून सान्यातून वडिलांनी त्याला वाचवले, अन्यथा त्या दिवशी त्याची सुटका नव्हती. त्याचा त्या दिवशी खूनच झाला असता व प्रकरण चिघळले असते. हे सांगण्याचे कारण असे की वडीलांना

अशी ही प्रकरणे हाताळावी लागत असत.नंतर

वडीलांनी त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून ते

मिटवले हे सांगायला नकोच. असे चौफेर कार्य

होते माझ्या वडीलांचे! अशाच एका महिलेलाही वडीलांनी मृत्यूच्या दारातून ओढून

आणले होते. गावातले लोक केव्हा काय उद्योग

करतील हे सांगणे कठीणच होते.

 

समोरच्या गल्लीतला एक माणूस दररोज इतकी दारू प्यायचा की त्याला शुद्ध नसायची.

आमच्या घरासमोरच चौठ्यात तो दारू पिऊन गटारीत पडलेला असायचा. सर्व गल्लीला रोज

तास दोन तास फुकटचा सिनेमा बघायला मिळत असे. मी खूप लहान असल्यामुळे खूप

घाबरून लांबून चोरून चोरून बघत असे व खूप

घाबरतही असे. आता वाटते शुद्ध नसतांना तो

चालतांना किती वेडावाकडा कितीतरी वेळा

धाडकन पडत असे. किती अंग ठेचकाळायचे

त्याचे? शिवाय घरच्यांना किती त्रास! इज्जत

बिज्जत प्रकार तर त्यांनी सोडूनच दिला होता.

गटारीतून ते त्याला न्यायलाही येत नसत.तासं तास तो तिथे पडून असे.

 

मला वाटते, आज ही वाटते, का पितात लोक

हे विष? कोणत्या अर्थाने ते उपयुक्त आहे?इज्जत सोडा पण कुटुंबाचे काय ? घरातला कर्ता पुरुषच असा वागत असेल तर बिचाऱ्या

त्या बायकोने कसा संसार करायचा? पूर्वी बायका शिकलेल्या नसायच्या. चरितार्थ

म्हणजे त्या वेळी शेतीच! नसेल तर मग मजुरी!

अशा लोकांकडे शेती असून दारूमुळे बायकांना मग मजुरी करून पोट भरावे लागे.

बायकांचे नशिब खूप खडतर होते नि आहे, फक्त परिस्थिती बदलली आहे पण दु:ख काही सोडून गेले नाही.

 

आज तर ही दारू मोठ्या प्रतिष्ठित नावांनी

घरा घरात विराजमान झाली आहे. मोठी क्रेझ आहे तिची. न पिणारा.. तो बावळट, असा आता समज आहे. काय उलटा न्याय आहे हो?

जग असे उलट्या दिशेने का चालते आहे? ह्या दारूने कुणाचे भले झाले हो? किती संसार उध्वस्त झाले, होत आहेत. आमच्या गल्लीतच

दारूड्या नवऱ्याला सोडून एक प्रतिष्ठित बाई निघून गेली, बिचाऱ्या मुलांचे काय हो? त्यांचा काय दोष हो यात? अकाली प्रौढ होतात अशी मुले!

त्यांचे भावविश्वच हरवून जाते हो! आता तर

रिटायर लोकांचे दारू चिकनचे गेट टुगेदर असते. उच्च शिक्षितांनीच बुद्धी गहाण ठेवता

अडाण्यांना काय बोलायचे? महिला, मुली, कॅालेज कुमारीही आता मागे नाहीत, हो त्या

शिवाय पुढारलेपण कसे सिद्ध होणार ना?

कालच माझी मैत्रिण सांगत होती. नातीला होस्टेल मिळाले, मेडिकल कॅालेजचे बरे, पण

नात तिथे रहायला तयार नाही. कारण ऐकून मी प्रचंड हादरले. अकरा साडेअकराला रूम मेट दारूच्या लपवलेल्या बाटल्या काढतात

व तिला आग्रह करतात. होस्टेल सोडून मुलगी

पळून आली व आजी आजोबा ह्या वयात तिला

सोबतीला फ्लॅटमध्ये आले. किती प्रगती पथावर आहोत ना आपण? आई वडील हाडाची काडे करून अवाच्या सवा मेडिकलची

फी भरणार नि ह्या पोरी होस्टेलच्या रूम मध्ये

त्या पैशांनी नशा करणार..! वा रे वा? पिढी?

कुठे चाललेत हे. मला कुणी बुरसटलेले म्हटले

तरी मी कधीच ह्या गोष्टींचा पुरस्कार करणार नाही. “आय हेट ॲाल दिज थिंग्ज “ .. त्या पेक्षा बुरसटलेले राहणे बरे ना? वाया जाण्या पेक्षा! तुमचे काय मत आहे? मी बुरसटलेल्या विचारांची आहे?

 

धन्यवाद मंडळी, आपका साथ बहुत जरुरी है!

 

जय हिंद .. जय महाराष्ट्र ..

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा