You are currently viewing मराठी अशी माझी मायबोली

मराठी अशी माझी मायबोली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम लेख*

 

*मराठी अशी माझी मायबोली*

*****************

 

*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी*!!

*जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी*!!

खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत!! कारण आपली मातृभाषा मराठी आहे. मराठी ही भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे मराठी माणसाची खासियत अशी की, तो हिंदी, संस्कृत या भाषा सहज समजून बोलू शकतो ?तसेच इंग्रजी बोलणे त्याला सोपे जाते. कारण मराठी भाषा ही या भाषांमधून विकसित होत गेलेली आहे. मराठी भाषा जणू एका स्त्री प्रमाणे आहे. अनुस्वाराची टिकली तिने लावलेली आहे .वेलांटीचा तिने पदर घेतला आहे .उकाराची कुंडले तिने जणू कानीं घातलेली आहे. एखाद्या खानदानी स्त्री सारखी जणूकाही पदराने भरगच्च अशी सजलेली ,नटलेली अशी ही आपली मातृभाषा मराठी भासते आहे. तिचा आपल्याला अभिमान का नसावा?

अहो मराठी ही काय काल परवा जन्माला आलेली भाषा नाही .तिला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे. पूर्वीपासून बोलली जाणारी अशी ही माझी मायबोली आहे. “काय गाऊ मी तिची महती !!काय सांगू मी तिचे कौतुकी !!”मराठी भाषेचा एक स्वतंत्र इतिहास आहे .मराठी भाषेचा उदय ंस्‍कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला .आपण थोडक्यात इतिहास पाहिला, तर ही भाषा सर्वप्रथम सातवाहन या साम्राज्याच्या प्रशासनात वापरली गेली .यादव काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराट झाली .मुकुंदराज हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध कवी होते. *विवेकसिंधु* हा ग्रंथ लिहून मुकुंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरले आणि माझ्या मायबोलीची भरभराट आणखीनच वाढू लागली .पुढच्या काळात ज्ञानेश्वर माऊलींनी *ज्ञानेश्वरी* ग्रंथ लिहिला .तसेच *अमृतअनुभव ,चांगदेव पासष्टी,* *हरिपाठ* लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले.

*आता विश्वात्मके देवे*।।

*येणे वागयज्ञे तोषावे* ।।

*तोषोनि मज द्यावे*।।

*पसायदान हे*।।

या ओळी ज्ञानेश्वरांच्याच!! समस्त प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी ज्यांनी हे पसायदान मागितले ते मराठीतच आहेत. “माझा मराठाची बोलू कौतुके !!

परि अमृतातेही पैजा जिंके” !!

असे निर्भयपणे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून टाकले .या शब्दात केवढी महती वर्णिली आहे माझ्या मायबोलीची!! संत *मुक्ताबाई* यांनी अभंग ओव्या रचून समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य दिले. नंतरच्या महानुभाव संप्रदाय काळात *संत एकनाथांनी* मराठी भाषेत भारुडे लिहिली. अंधश्रद्धेपासून दूर करून समाजाला वेळीच जागं करण्याचं काम या त्यांच्या भारूडातून स्पष्ट दिसून येते. शाहिरी वाड:मय म्हणजे लावण्या व पोवाडे केवळ मराठीतच आहे.

माझी मायबोली अशीच पूर्व काळापासून रुजत असताना त्या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि मराठी समृद्ध होऊ लागली. आज मराठी भाषा ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त *छत्रपती *शिवाजी महाराज* यांच्यामुळे!! त्यांच्या काळात मराठीला खरे महत्त्व प्राप्त झाले होते. शासकीय कामकाजात आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला .मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचाही विस्तार झाला .या काळात मराठी मोडी लिपीत लिहिली जात असे!! *संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी* याच काळात मराठीत ४१४१ अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले .

*वृक्षवल्ली आम्हा*।।

*सोयरे वनचरे*।।

बघा, बरे !या चार शब्दांमध्ये किती विश्वाचा अर्थ सामावलेला आहे? अशाप्रकारे संत साहित्य रुजत गेले. मराठी भाषा फुलत केली.

*रामदास श्लोकी दंग*

*तुकाचे ऐकावे अभंग*

*एकनाथी भारुड पाठ*

*ज्ञानदेवांचे हरिपाठ*

हे आहे मराठीत…….

 

नवव्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार *विष्णुशास्त्री चिपळूणकर* यांनी आपले नियतकालिक सुरु केले *महात्मा ज्योतिबा फुले* आणि *गोपाळ हरी देशमुख* यांनी “दीनबंधू “आणि ‘प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी आपल्या करारी घोषणेने सारे राष्ट्र गदागदा हलवून टाकले. ती त्यांची अमृतघोषणा *स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच*! ही अस्सल मराठीतली आहे .लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सानेगुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, इत्यादी स्वातंत्र सेनानींनी मराठी भाषेत वेगवेगळे ग्रंथ लेख आणि पुस्तके लिहिली. यामुळे स्वातंत्र्यलढ्याला आणि लोकांच्या विचारसरणीला योग्य दिशा मिळूलागली. देश खडबडून जागा होऊ लागला.स्वातंत्र्य लढ्यात अनेक लहान मोठ्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या पद्धतीने योगदान दिले आणि समाज जागृतीसाठी मराठीतूनच अनेक लेख ,लिहिले व समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सुरू झाले.

त्यापुढील शतकांमध्ये वेगवेगळे वक्ते ,लेखक ,कवी, महाराष्ट्राला लाभले. पु. ल. देशपांडे बहिणाबाई चौधरी, शिवाजी सावंत. वि .स. खांडेकर, आचार्य अत्रे अशा अनेक साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य जवळ घेऊन मराठी भाषा एखाद्या खजिना सारखी उभी राहिली.

 

मी तर म्हणेल, ज्याला तो खजिना लुटला तोच खरा श्रीमंत !!कुसुमाग्रजांनी मराठी ची महती वर्णिली आहे.

“माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा।।

हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा” ।।

अशा रीतीने मराठी भाषेचा गोडवा संस्कार रुजताना मनोरंजनही साधले जाऊ लागले . मला असे वाटते ,की मराठी वाचक हा खरंच श्रीमंत आहे .याचे उदाहरण देताना मी म्हणेल की ,एका मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत. अहिराणी, पावरी, कोळी, वर्‍हाडी, मालवणी ,कर्नाटकी, पुणेरी ,कोकणी ,देशी, कोल्हापुरी ,सातारी इंद्राच्या दरबारातील सांडलेल्या अमृतातून जणू माझी मराठी मायबोली निपजली आहे. संस्कृत सारखा व्याकरणाचा सोस मराठी भाषेला नाही. संस्कृत प्रमाणे ती केवळ ग्रंथ भाषा नाही. संस्कृत पेक्षा मला मराठीच अधिक आवडते, कारण संस्कृत मध्ये नसलेले हे *ळ* अक्षर मराठीत आहे .ती एक लोक भाषा म्हणजे जिवंत भाषा आहे. इतर भाषांतील सुंदर सुंदर शब्द तिने निर्माण केले आहे. आई ,काका, बाबा, अण्णा कानडीतून घेतली आहे. मराठी साहित्याचा हा एक अनमोल हिरा आहे. आपण आपल्या हृदयात साठवून ठेवू या !

पण आता ज्ञानाची कोणती शाखा मराठीला अनोळखी राहिलेली नाही .विज्ञान, यंत्रशास्त्र ,तंत्रशास्त्र, न्याय, वैद्यकीय सर्व शास्त्र ,विविध कला, अनेक विषयांवर शेकडो उत्तमोत्तम ग्रंथ मराठी भाषेत लिहिले जातात. मराठी भाषेतील ग्रंथांचे आता अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. माझी मराठी मायबोली अमृता होऊनही श्रेष्ठ दर्जाची आहे. म्हणूनच मी सांगू इच्छिते की, मराठी ही असे माझी मायबोली!!

 

*संत साहित्याची देन*

*बहु असे शब्द धन*!

*संस्कृतीचे कर जतन* !

*तू एकदा कर वाचन* !

*बोलु मायबोलीतून*!

अशी माझी माय मराठी चला बोलू या कौतुके!!….

बोलू या मराठी…

वाचू या मराठी…

लिहू या मराठी…

ऐकू या मराठी…

✍️✍️✍️✍️✍️

 

*****************

*स्वरचित लेखांकन*

✍️✍️✍️✍️✍️

सौ.वंदना राजेंद्र गवळे

( शिक्षिका)

डॉ.विजयराव व्ही .रंधे इंग्लिश मेडीअम स्कूल *शिरपूर*. जि. धुळे.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − five =