कणकवलीत 3 मे रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा – जिल्हाप्रमुख संदेश पारकर
कणकवली
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 6 कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला कणकवली विधानसभा आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील 5 तालुक्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी विजय भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पारकर म्हणाले, या मतदारसंघातील 2200 गावे 23 हजार वाड्यांतील प्रत्येक घरात खा. राऊत यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. मागील 10 वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राऊतांना एक लाख पेक्षा अधिक मताधिक्याने मिळणार अाहे. विरोधी उमेदवार नारायण राणे यांचा या आधी दोन वेळा पराभव शिवसेनेने केला आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात पहिल्यांदा आमदार वैभव नाईक यांनी आणि नंतर बांद्रा पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला. राणेंचा जनाधार आता संपला आहे. त्यामुळेच राणेंचा तिसर्यांदा पराभव करून राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात राणेशाही आता संपली असून सामंतशाही आस्तत्वात येईल म्हणून राणेंनी किरण सामंत यांच्या उमेदवारीला विरोध करून स्वतःसाठी उमेदवारी मिळवली. कोकण ही परशुरामाची भूमी असून अति तिथे माती करणारी ही भूमी आहे. मोदींच्या करभाराविरुद्ध जनतेत प्रचंड रोष आहे. 4 जून रोजी निवडणूक निकालात हा रोष दिसून येईल. मोदींच्या काळात बेरोजगारी वाढली असून महागाईने जनता त्रासली आहे. जनतेत भाजपा आणि मोदींविरोधात संतापाची लाट आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी झुकते माप दिले. शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून त्यासाठी कोट्यवधी निधी दिला. चिपी विमानतळ पूर्ण केले. जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असून विनायक राऊत यांना मतदान करून जनता विरोधकांना चितपट करेल, असा दावा पारकर यांनी करतानाच राऊत यांच्या खळा बैठक, जाहीर सभांना मतदारसंघात जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या सभेला हजारोंच्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन पारकर यांनी केले.