सिंधुदुर्ग जिल्हा देखील पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा यासाठी माझे प्रयत्न – मंत्री नारायण राणे:
सिंधुदुर्गातील मतं ही माझी हक्काची आहेत. इथून मला ८० ते ९० टक्के मतं मिळाली पाहिजेत…
बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगतच असलेल्या गोवा राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून आपला विकास साधला आहे. त्यांचं राहणीमान त्यांची श्रीमंती आपल्यापेक्षा जास्त आहे. आंबोलीसारखे हिल स्टेशन व विस्तीर्ण समुद्रकिनारा एकाच जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग जिल्हा देखील पर्यटनाच्या दृष्टीने निसर्ग संपन्न आहे. त्यामुळे प्रगती कडे वाटचाल करणारा हा जिल्हादेखील पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. कारण कोकणचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून मोदींना समर्थ साथ देण्यासाठी व आपला जिल्हा समृद्ध करण्यासाठी आपला हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
मोदींच्या नेतृत्वात आपला देश आज सुरक्षित आहे. कोणाची या देशाकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत होत नाही. कारण देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे देशातील १४० कोटी जनतेचे जीवनमान उंचावण्याचं काम देखील ते करीत आहेत. हा देश आत्मनिर्भर व्हावा व २०४० पर्यंत आपला देश महासत्ता बनावा यासाठी मोदींचे प्रयत्न सुरू असून तशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देणे हे आपले कर्तव्य असून तुम्ही ते नक्कीच पार पाडाल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी नेहमीच आमचे प्रयत्न राहिले आहेत. माझ्या एम एस एम ई खात्याच्या माध्यमातून तसेच कॉयर इंडस्ट्रीच्या माध्यमातून येथील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात आमचे प्रयत्न राहणार आहेत. त्याचप्रमाणे ओरोस येथे मी सुरू करीत असलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून देखील फळ प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्गातील मतं ही माझी हक्काची आहेत. इथून मला ८० ते ९० टक्के मतं मिळाली पाहिजेत. कारण मागील ३५ वर्षात या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. १९९० मध्ये मी या जिल्ह्यात आलो तेव्हा गरिब व दरिद्री म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनला. जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधा मी निर्माण केल्या. आता राहिलेला रोजगाराचा मूलभूत प्रश्न सोडवायचा असून त्यासाठी तुमच्या सहकार्याची मला गरज आहे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
विकास साधायचा असेल तर येथील जनतेने आपली मानसिकता बदलायला हवी. ‘आमका करूचा नाय ‘ हे बदलून ‘ करूक व्हया ‘ ही भूमिका जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवी. दीपक केसरकर व आमच्यामध्ये काही तात्विक वाद होता मात्र विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र आल्यामुळे आता विकासाचा वेग नक्कीच वाढेल. मात्र, तो कायम राखणं तुमच्या हातात आहे. मोदी का हवेत राणे का हवेत हे येथील जनतेला घराघरात जाऊन सांगा व या निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान करून प्रगतीचा हा आलेख उंचावत ठेवा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.