सावंतवाडीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवस साजरा…
सावंतवाडी
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अकरा ही जागा ताब्यात घेऊन सावंतवाडीतील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्या वर्षाची भेट द्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
दरम्यान अन्य पक्षात कापाकापीचे राजकारण आहे. परंतु शिवसैनिकांनी माझ्या वाढदिवसाचा केक कापून जो माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवला, त्याचा मी कायम आभारी राहीन. येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री.उदय सामंत यांचा वाढदिवस आज सावंतवाडीतील शिवसैनिकांच्या माध्यमातून येथील माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री.सामंत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, या ठिकाणी जिल्ह्याचा विकास करण्याची संधी मला मिळालेली आहे. माझ्या काळात जिल्ह्याचा महत्वाकांक्षी ठरलेला चिपी सारखा प्रकल्प सुरू होणार आहे. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देईल. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका जास्तीत जास्त जागा शिवसेनेकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करा, सावंतवाडीतील अकरा ही ग्रामपंचायती शिवसेनेकडे ठेवून येथील कार्यकर्ते व पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना नवीन वर्षाची भेट द्यावी, असेही त्यांनी सांगितले.