बांदा
कास येथील श्री देवी माऊली जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माऊली मंदिर परिसरात सावंतवाडी तहसीलदारांकडून आज भादवि कलम १४४ जारी करण्यात आले आहे. पंडीत व भाईप या दोन्ही गटांना जत्रोत्सव साजरा करण्यास बंदीचे आदेश तहदीलदारांनी पारीत केले आहेत. त्यानुसार बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व एसआरपी फौजफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे.
कास येथील पंडीत गटाने जत्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात बांदा पोलीस स्थानकात अर्ज दिला होता. त्यानुसार आज उत्सव साजरा करण्याची तयारीही करण्यात आली होती. तर भाईप गटाने जत्रोत्सवावर बंदी आणण्यासाठी अर्ज दिला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जत्रोत्सवावर बंदी आणण्याचा अहवाल बांदा पोलीसांनी तहसीलदारांना दिल्यावर सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंदिर परिसरात जमावबंदी आदेश पारित केला आहे.
कास माऊली मंदिर परिसरात पोलीसांसह राज्य राखीव पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पाच किंवा अधिक ग्रामस्थांना जमाव करण्यास अटकाव करण्यात येत आहे.