सावंतवाडी :
सिंचन क्षमतेत सर्वाधिक पिछाडीवर असलेल्या कोकणातील अपूर्ण धरणांचा प्रश्न गेली 20-22 वर्षे पुढे सरकलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7 प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील 7 प्रकल्प, पालघरमधील 3 प्रकल्प, रायगडमधील 5 प्रकल्प असे एकूण मध्यम 22 प्रकल्प, तर लघू 100 प्रकल्पांची कामे प्रलंबित आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास पूर्ण झालेल्या देवघर धरणाच्या कालव्यांचे काम न झाल्याने शेतकर्यांना पाणी मिळत नाही. उर्वरित धरणांपैकी नरडवे महंमदवाडी, कुडाळ टाळंबा, वैभववाडी अरुणा, सावंतवाडी शिरशिंगे, सरंबळ, देवगड सातर्डी, तर लघू पाटबंधारेंपैकी नाधवडे, तरंदळे, दिंडवणेवाडी, तळेरे यांचा समावेश आहे.
ठाण्यातील शहापूर आणि मुरबाड, पालघरमधील मोखाडा, जव्हार, वाडा आणि विक्रमगड, रायगड जिल्ह्यातील पेण, कर्जत, महाड, पोलादपूर, रत्नागिरीतील खेड, चिपळूण आणि लांजा तालुक्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने जनतेत असंतोष आहे.
प्रलंबित प्रकल्पात रायगड जिल्ह्यात महाडमध्ये कोथेरी, माणगांवमध्ये कुंभे, कर्जत तालुक्यात कोंढाणे, अलिबाग तालुक्यात सांबरकोंड, सारळभोर, पेणमध्ये बाळगंगा आणि हेटवणे हे प्रकल्प अपूर्ण आहेत. यामधील हेटवणे, कुंभे या धरणात पाणी अडवण्यात आले असले तरी त्याचे कालवे काढण्यात आलेले नाही. कालवे, पाईपलाईन नसल्याने शेतकर्यांना पाणी मिळत नाही. तर बाकीच्या धरणांची 10 ते 40 टक्के कामे झाली आहेत, तर 2 धरणांचा शुभारंभ व्हायचा गेल्या 20 वर्षांपासून निधीची प्रतीक्षा आज ही आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये करवाळे, कमारे, मनोर, केळवे, माहीम, झंजरोळी, देवखोप, डहाणूमधील आसवली, रायतळी, साखरे, विक्रमगडमधील पिंजाळ, देहर्जे, खांड, मोहोखुर्द, कुर्झे, जव्हारमधील खडखड, जयसागर, मोहोहिरा, मोखाड्यामधी वाघ आणि सायजे असे प्रकल्प अपुर्ण आहेत. तर धामणी, कवडसा आणि वांद्री हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधील अर्जुना-राजापूर हा मध्यम प्रकल्प गेले 15 वर्ष प्रलंबित आहे.
*पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात अपयश*
पावसाचे पाणी साठविता न येण्यामागे भौगोलिक कारणेही सांगितली जातात. कोकणातील लाल मातीची पाणी साठवण क्षमता कमी आहे. तसेच येथील डोंगररांगामुळे आणि कातळ जमिनीमुळे पाणी वाहून जाते. हे सारे खरे असले, तरी जेवढे पाणी साठविणे शक्य आहे, त्यासाठी पूर्ण प्रयत्न झाले का? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच येते. या भागातील धरण, बंधारे यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. हे प्रमाण कसे वाढविता येईल, यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास, नियोजन आणि कठोर अंमलबजावणीची गरज आहे.
*पाणी समस्येचे कारण*
1) आपल्याकडील बहुसंख्य पाणी योजना या ठेकेदारीप्रधान आहेत. ठेकेदार, अधिकारी आणि नेते यांच्या संगनमताने चालणार्या या योजनांमधून प्रत्यक्षात काही होणे अवघडच आहे.
2) लोकांच्या हितापेक्षा ठेकेदाराचे आणि सत्ताधार्यांचे हित जपले जातेे. तज्ज्ञांच्या मते, कोकणातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मोठ्या धरणांची गरज नाही. मोठी धरणे ही खर्चिक असतात.
3) आधीच आर्थिक चणचण असताना अशा धरणांना निधी वेळेत मिळत नाही. त्यामुळे ती अपूर्ण राहतात. या उलट मोठ्या धरणाच्या किमतीत नद्यांवर लहान लहान धरणे अथवा बंधारे घातले, तर त्यासाठी येणारा खर्च कमी असेल.
4) विकेंद्रित स्वरूपात पाणी अडवले जाईल आणि त्याचा फायदा आसपासच्या लोकांना होईल. हे साठलेले पाणी जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होईल.