*अभिवादन कविसंमेलन संपन्न*
निगडी, प्राधिकरण-(प्रतिनिधी)
रविवार दि.२१/०४/२०२४ – दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे सभागृह, प्राधिकरण , निगडी,पुणे येथे अभिवादन कविसंमेलन (कविता माणुसकीची, शब्द सामाजिक न्यायाचे) संपन्न झाले.
मातंग साहित्य परिषद, पुणे व समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचचड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उद्घाटनाचे प्रथम सत्र ज्येष्ठ पत्रकार व दैनिक मुंबई तुरुण भारत या वृत्तपत्राच्या उपसंपादिका योगिताताई साळवी,समरसता गतविधीचे विभागीय संयोजक विलासजी लांडगे,कवी संमेलनाच्या अध्यक्षा शोभाताई जोशी, उज्ज्वला केळकर, वेणूताई साबळे,मानसी चिटणीस,प्राचार्य डॉ.संजय चाकणे, सौ.रेवती साळुंखे,अनिल नाटेकर, जयश्री श्रीखंडे, राजेंद्र भागवत, प्रदीप पाटील, सुहास घुमरे, वेणूताई साबळे,डॉ.धनंजय भिसे,प्रा.सचिन पवार,नाना कांबळे, सुहास देशपांडे, महेंद्र बोरकर,रमेश वाकनीस, श्रीकांत चौगुले, प्रा.महदेव रोकडे,रविंद्र जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम सत्राचे सूत्रसंचालन मा. मानसी चिटणीस यांनी केले.
द्वितीय सत्रात महापुरुषांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कविसंमेलन झाले.
“प्रेरणा देई जगाला झुंजणारा जय शिवाजी
आसमंती तळपणारा दिव्य तारा जय शिवाजी ”
अशी प्रेरणादायी रचना आळंदी चे कवी अनिल नाटेकर यांनी खड्या आवाजात सादर केली.
योगिता कोठेकर यांनी “माझ्या शिवबाचे राजा शिवाजीचे गाऊ किती गुणगान” अशी गेय रचना सादर केली.
ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांनी “ज्ञानाचा अथांग सागर भीमराव आंबेडकर” म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचे गुणगान कवितेतून केले.
पिंपळे गुरव चे कवी आत्माराम हारे “जगायचेच आहे तर सुगंधित फुलासारखे जगा, मेल्यावरही लोक नाव काढतील असे छान वागा”असा संदेश कवितेतून देऊन गेले.
“मी आहे तोवर जगून घेवू दे, आनंदाचे क्षण सारे साजरे करू दे मज” असे प्राधिकरण मधील प्रतिमा काळे आपल्या कवितेत म्हणाल्या.
“जोतिबांनी ज्योती लावली शिक्षणाची तळागाळातल्यांना ती गोडी विद्येची” असे आपल्या कवितेतून माधुरी डिसोजा यांनी जोतिबा आणि सावित्रीबाई यांना अभिवादन केले.
याशिवाय आशा नष्टे, राहुल भोसले, धनंजय इंगळे,चंद्रकांत जोगदंड,विजय जाधव,मानसी चिटणीस ,जयश्री श्रीखंडे आदि कवींनी सुंदर कविता सादर केल्या. त्यांना सन्मान पत्रे व्यासपीठावरील मान्यवरांनी दिली. या सत्राचे कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री जयश्री श्रीखंडे यांनी केले.
सर्व उपस्थितांनी यावेळी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.