You are currently viewing मतदार संघात दाखल झाली आलिशान कार… भूलभुलैया

मतदार संघात दाखल झाली आलिशान कार… भूलभुलैया

*मतदार संघात दाखल झाली आलिशान कार… भूलभुलैया*

*१४ वर्ष भूलभुलैया आणि भूलथापा*

*दहा वर्ष दहशदवाद आणि आता राणेंची गळाभेट*

*बाळासाहेबांचा धनुष्यबाण पळविण्याच्या कटात सहभाग*

सावंतवाडी

आंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला आहे. जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी आणून पुन्हा एकदा भूलभुलैया करत असल्याची टीका ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
मंत्री दिपक केसरकर यांनी आमदार, मंत्री झाल्यावर गेल्या चौदा वर्षात भुलथापा, भूलभुलैया केल्या. त्यामुळे जनतेने डोळे उघडले आहेत. केसरकर यांना मतदानाच्या माध्यमातून पक्ष बदलू, शिवसेनेला धोका देऊन धनुष्यबाण पळवून नेण्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला असल्याने जागा दाखविणार आहेत असे राऊळ यांनी सांगितले.

कोरोना काळात मुंबईत झोपेचं सोंग घेऊन राहीलेले केसरकर यांनी मंत्री झाल्यावर लोकांची विचारपूस करायला वेळ दिला नाही. सावंतवाडीत भेटायला गेलेल्यांना विमान चुकणार अशी टोलवाटोलवी करत आहेत. ते फक्त भूलभुलैया करत आहेत त्यामुळे जनता आता माफ करणार नाही, असे राऊळ यांनी सांगितले. नारायण राणे यांच्या विरोधात दहा वर्षांपासून दहशत दहशत म्हणून रान उठविले आणि आता मांडीला मांडी लावून गोडवे गात आहेत. त्यामुळे केसरकर यांचा फसवा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्याचा पर्दाफाश होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनता महागाईने होरपळत आहे. तसेच फळबागांना अवकाळी पाऊस, बदलते पर्यावरण आणि फलधारणा नसल्याने तसेच काजूला हमीभाव नसल्याने आर्थिक दृष्ट्या संकटात सापडली आहे. मात्र केसरकर यांना त्याचे सोयरसुतक नाही ते खोकेवाल्या सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्या उन्मादात लोक आर्थिक दृष्ट्या संकटात सापडले असताना आणि रणरणत्या उन्हात चटके खात असताना अलिशान एअर कंडीशन गाडीतून मत मागायला जाताना आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करून जनतेसमोर पुन्हा एकदा भूलभुलैया करण्याच्या तयारीत आहेत. आता जनतेनेच ह्या फसव्या चेहऱ्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे असे रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा