दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कने केलेल्या कारवाईत ओरोस येथे दोघे ताब्यात
बांदा
राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने ओरोस- कुडाळ येथे टेम्पोतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत ४९ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सोमनाथ भीमराव जाधव (वय ३४, सुरेश किराणा स्टोअ, रेवती बंदर, ठाणे-नौपाडा) व अशोक पुराणलाल देशमुख (वय २६, दनोरा बैतल, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कोल्हापूर विभाग भरारी पथक मुंबई-गोवा महामार्गावार ओरोस- कुडाळ येथे गस्तीवर होते. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या टेम्पोला तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनवटीच्या दारूचा अवैध साठा आढळला. पथकाने १८० मिलीच्या एकूण २६,४०० सिलबंद प्लास्टिक बाॅटल असे एकूण ५५० बेकायदा खोके जप्त केले. ३४ लाख ३२ हजार रुपये किमतीची दारू, १५ लाख रुपये किमतीचा टेम्पो व मोबाईल २३ हजार असा एकूण ४९ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस एस गोंदकर, वाय. एन. फटांगरे, सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार, योगेश शेलार यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक गोंदकर करीत आहे.