You are currently viewing पहिला आंबा

पहिला आंबा

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूह सदस्य ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*पहिला आंबा* 

 

-अनिल देशपांडे

 

पहिला पाऊस , शाळेचा पहिला दिवस , स्वतः लावलेल्या झाडाचे पहिले फुल , वगैरे पहिल्या वहिल्या गोष्टीतील आणखी एक गोष्ट म्हणजे मौसमातला पहिला आंबा व त्याची पहिली फोड …अहाहा ….

कसंय , आंबा आला आला म्हणतां व तो शोधून घरी आणणे म्हणजे , एक संशोधनी वृत्ती व तीव्र शौकिनता लागते , व ते सर्व (अव)गुण आंबा प्रेमीं मधे असतात हा माझा (गोड)समज आहे !पण एक नक्की मोसमातला पहिला आंबा शोध शोधून खाणे म्हणजे स्वर्गीय आनंद !!

कडकडीत मार्च , एप्रिल , मे महिन्यातील जाळणाऱ्या ऊन्हाळ्यात (सद्या मी पुण्यातील सुखद (?) ऊन्हाळा गेली दहा वर्षे अनुभवतोय !) एकच सुखद गोष्ट म्हणजे पिवळा धम्म् रसाळ हापूस आंबा !

एकीकडे ऊन्हाच्या काहिली मुळे हे महिने नकोसे वाटतात , पण रसाळ , गोडसर आंब्यांच्या सुगंधाची नुसती आठवण झाली की वर्षभर “एप्रिल -मे “हेच महिने असावेत असे वाटते !खरंतर बरीच वर्ष खान्देश व नाशिक मधे काढल्याने , रखरखीत ऊन काय असतं याची चांगलीच सवय झालेली असून सुध्दा तिथला ऊन्हाळा मी विसरायला लागलोय . त्याच खरं कारण येथे पुण्यात मिळणारा आवडीचा आंबा !तसा आंबा सगळीकडेच मिळतो , पण इतर गावांपेक्षा पुणे , मुंबई , कोल्हापुरात त्या मानाने लवकर येतो . नाही का ?

मोसमातील पहिल्या आंब्याची गोडी काही औरच असते .

माझ्यासारखे आंबाप्रेमी शौकीन तर जानेवारी पासूनच आंब्याच्या प्रतिक्षेत असतात . मग फेब्रुवारी नुसता आठवणीने कासावीस जातो …

मार्च महिना लागला रे लागला की नुसती शोधाशोध सुरू होते . कुठे आलाय ?, कसा आहे ?,वगैरे वगैरे आणि सरते शेवटी चिरंजीवाच्या मदतीने सरते शेवटी ते स्वर्गिय फळ हातात पडतं . अन् आनंद गगनात ( खरं तर पोटात ) मावेनासा होतो .त्या गोड फळाचा पहिला थेंब म्हणजे अमृत असतं , मित्रा !

तुम्ही पण आठवून पहा मोसमातली पहिली आंब्याची फोड वा थेंब ! विसरणारच नाही …

कारण पहिला आंबा खाणं म्हणजे एक इव्हेंचट आहे ..

आतां तुम्ही तय्यार तयार आहात कां आंबा खायला ?..

लागा की मग आमरस -पुरी चा बेत आखायला …आणि ताव मारायला ..

खरं तर मी काही कोकणांत राहिलेलो नाही किंवा वाढलेलोही नाही . पण आंबा आणि त्यातुन हापूस म्हणजे जिव्हाळा !

खरं तर आंब्यासाठी काहिही या सदरात मी मोडतो .जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे , या प्रश्नाला आंब्याच्या सिझन मधे तरी , मी खाण्यासाठी जगणे हे मानतो ( आणि हो अगदी रक्तातील शर्करा सुध्दा मला साथ देते !)

एक गंमत म्हणजे हापूस चा भक्त असलो तरी कधी आंब्याचे आयस्क्रीम ही तेवढेच आवडते …

तसेच लहानपणी गच्चीत वाळायला ठेवलेली

“आंब्याची पोळी “ चोरून चाखण्यात व त्यातलाच लहानसा तुकडा मित्राला देण्यातला आनंद ही मी लपवू शकत नाही .

काही आमरस व भात , तर काही आमरस व पुरण पोळी पण आवडीने खातात . खरंतर आमरस -पुरी किंवा साधी गरम गरम लुसलुशीत पोळी त्यावर साजुक चमचाभर तुप आणि चिमुटभर मिठ ….

या पेक्षा अजून काय पाहिजे ?

बघा तुम्हालाही आवडतंय का !

आणि संपवूया आंबापुराण .

प्रतिक्रिया व्यक्त करा