*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
*(श्री गजानन विजय ग्रंथ)*
अध्याय अठरावा
कैवल्याच्या चांदण्यांची
प्रभा विखुरे वाड्यात
साकारले विठू रूप
श्रींनी मोहक रूपात ||
चला पंढरीला जाऊ
भेटू हरीच्या वाड्यात
लाभ दर्शनाचा घेऊ
अठराव्या अध्यायात ||
हरी पाटील समर्थ
आषाढीच्या नवमीस
समवेत बापुना हो
गेले पंढरपुरीस ||
भूवैकुंठ ही पंढरी
भक्तजन मांदियाळी
जय रामकृष्ण हरि
नामामध्ये हो रंगली ||
संत पालख्या पंढरी
झाले बुक्क्याचे ते छत
गंध तुळशी फुलांचा
चोहीकडे हो वाहत ||
हरि सोबत सगळे
गेले राउळी दर्शना
मागे राहिला बापुना
गेला होता तो स्नाना ||
गेला पळत बापुना
हेतू दर्शनाचा मना
गर्दी राउळी अमित
कैसी हो पूर्ण कामना ||
आर्त प्रार्थिले विठूसी
का रे निष्ठुर तू होशी
अनाथांचा तूच नाथ
धांव घेई मजपाशी ||
झाला हताश बापुना
परतला बि-हाडाशी
हसू लागे सर्वजण
चित्त त्याचे विठूपाशी ||
खेळ पाहात फिरला
आता कशाचे दर्शन
भक्ती अवघी दांभिक
बोलू लागले ते जन ||
दु:ख नको करू मना
बघ रूक्मिणी रमणा
कटीवर हात श्रींचे
जुळेविले हो चरणा ||
मूर्ती सावळी गोमटी
माळ तुळशीची कंठी
बापुनाच्या दृष्टी दिसे
बुडे “भावांत” आकंठी ||
मन असावे निर्मळ
भाव आर्त तळमळ
धांव घेतो गुरू ईश
सत्य ठेवा कळकळ ||
©️®️
सौ.मंजिरी अनसिंगकर ,
नागपूर.