मालवण :
मालवण कसाल मार्गांवरील सावरवाड तिठा येथे दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात वराड गावातील एका महिलेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर या मार्गांवरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली.
रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत यासाठी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा करणारे राजन माणगावकर यांनी पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे लक्ष वेधत तात्काळ खड्डे बुजवण्याबाबत आक्रमक भूमिका मांडली. दरम्यान बांधकाम विभागाने मालवण कसाल मार्गांवरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही तात्काळ हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यात आले आहेत. राजन माणगांवकर यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य नंदन केसरकर, अजय चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.
मालवण कसाल रस्ता मार्गांवर बरीच झाडे जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत आहेत. तरी अशी झाडे तोडण्यात यावीत. तसेच वराड पेट्रोल पंपाच्या जवळ गतीरोधक असावेत. सावरवाड मराठी शाळे नजीक रसत्यावर गतिरोधक पांढरा पट्टा व फलक गरजेचे आहेत. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबतही बांधकाम विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे.