You are currently viewing तीन महिन्यांची मुदत द्या; उद्योजकांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

तीन महिन्यांची मुदत द्या; उद्योजकांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

कोरोनामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आता कुठे आर्थिक व्यवस्था रुळावर येत आहे. अशावेळी आयकर भरण्याच्या कामात वेळ गेल्यास आणखी नुकसान होऊ शकतं, असं कारण देत देशातील उद्योजकांनी आयकर भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे केली आहे. येत्या 31 डिसेंबर 2020 रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत असल्याने 7 कोटी उद्योजकांची संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ही मागणी केली आहे.

 

31 डिसेंबर 2020 रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत आयकर भरण्यासाठी सरकारकडून आवाहन केलं जात आहे. या शिवाय रोज किती करदात्यांनी आयकर भरलाय त्याची माहितीही शेअर केली जात आहे.

 

आयकर विभागाने केलेल्या ट्विटनुसार 25 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाख 82 हजार 988 करदात्यांनी आयकर भरला आहे. 24 डिसेंबरपर्यंत 3.97 कोटी करदात्यांनी कर भरला आहे. यातील 2.27 कोटी करदात्यांनी आयटीआर-1 फॉर्म भरला आहे. ITR-1ला ‘सहज’च्या नावाने ओळखले जातं आतापर्यंत 85.20 लाख करदात्यांनी ITR-4 फॉर्म भरला आहे. त्याला ‘सुगम’ नावानेही संबोधले जाते.

 

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि कॅटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी निर्मला सीतारामण यांना पत्रं लिहिलं आहे. त्यात त्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन जीएसटीवर पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. जीएसटी प्रणालीची समीक्षा करतानाच ही प्रणाली आणखी सोपी करण्यावरही विचार झाला पाहिजे. तसेच या प्रणालीची व्याप्ती कशी वाढवता येईल तसेच केंद्र आणि राज्याच्या महसुलात वाढ कशी होईल, याचाही विचार केला गेला पाहिजे, असं सांगत कॅटच्या अध्यक्षांनी सीतारामण यांची या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + six =