सावंतवाडी :
माडखोल फौजदारवाडी येथील पावणाई मंदिर जवळ गोव्यातून येणाऱ्या कारवर इन्सुली एक्साईजने कारवाई केली. या कारवाईत ४ लाख ८६ हजार रुपयांची दारू व ६ लाख ५० हजारची कार असा एकूण ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी रवी सावंत (३१, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.
गोव्यातून सिंधुदुर्गात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची माहिती एक्ससाइजचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांना प्राप्त झाली होती. त्यांच्या निर्देशानुसार माडखोल येथील पावणाई मंदिर जवळ वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान आलेली बलेनो कार (एमएच ०७ एबी ७०५०) तपासणीसाठी थांबवली असता त्यात ४५ दारूचे बॉक्स आढळून आलेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.