गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायतीला “छत्रपती शिवाजी महाराजांची” मूर्ती युवा वर्गाकडून भेट..
कुडाळ :
मांडकुली गावातील शिवप्रेमी, युवा वर्गाने कोकण ची संस्कृती, कोकण च्या लाल मातीतील सर्वांग सुंदर आविष्कार राधा नृत्य सादर करून”शबय” च्या माध्यमातून निधी गोळा करून गावातील ग्रामपंचायतीला छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट म्हणून दिली! साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा आणि याच शुभदिनी हे शिवकार्य करण्यात आलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले होते.
कोकणातील घराघरात गणेशोत्सव साजरा होतो पण शिवजयंती हि काही सार्वजनिक ठिकाणीच साजरी केली जाते. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम व जयंतीच्या वेळी आपल्याला महाराजांची मुर्ती पूजन करण्यासाठी उपलब्ध व्हावी या स्वच्छ हेतूने हे कार्य करण्यात आलं आहे. आता दरवर्षी शिवजयंती सुद्धा याच जल्लोषात साजरा करण्याचा मानस हा या गावातील युवा वर्गाचा आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्य करत महाराजांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली. उत्साही वातावरणात सर्व ग्रामस्थ, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील शिवप्रेमी, शिव कन्या यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमा दरम्यान कु. ओंकार अनिल येरम (पोईप, मालवण) हे शिवव्याख्यान देण्यासाठी उपस्थित होते तसेच आदरणीय श्री. सुनील पालव सर यांनी पण युवा वर्गाला अनमोल असं मार्गदर्शन केलं. विविध स्तरावरून तसेच शिवप्रेमींकडून या अनोख्या संकल्पनेच कौतुक केलं जात आहे. खरतर गेल्या काही दिवसांपूर्वीच होळी, शिमगोत्सवाची सांगता झाली. शिमग्यामध्ये कोकणात राधा नृत्य ही एक पारंपरिक शबय मागण्याची पद्धत आहे.
मांडकुली गावातील युवा तसेच शिवप्रेमी यांचा एक संकल्प होता की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यायची आहे. शिवजयंती असो किंवा गावातील कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो… गणेश पूजना सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पूजन केली जाते. पण आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नव्हती त्यामुळे ती इतर ठिकाणाहून आणावी लागत होती. शिवजयंतीच्या वेळेस सुद्धा महाराजांची मूर्ती उपलब्ध नसल्याने फोटोच पूजन केलं जात होतं. खरंतर शिवजयंती हा आपला सण आहे आणि तो साजरा झालाच पाहिजे अशी इच्छा प्रत्येक शिवप्रेमी शिवभक्ताची होती तीच इच्छा या संकल्पनेतून पुर्णत्वास आली आहे. त्यांचा हा संकल्प शबय च्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे.
मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रॅलीसहित शिवमूर्ती ग्रामपंचायत मांडकुली मध्ये सप्रेम भेट देण्यात आली. गावातील ज्येष्ठ व्यक्ती श्री. वामन गावडे, श्रीकांत कासले, बुवा दिपक खरूडे, हरेशजी नेमळेकर, विनायक सावंत, सुमन गावडे, ज्ञानेश्वर कासले, प्रसाद वारंग यांच्यासह युवावर्ग कु. अजय कासले, अक्षय कासले, वेदांत गावडे, सुरज शेगले, मयुर नाईक, विक्रांत गावडे, आकाश कासले, महेश मोर्ये, मनीष मोर्ये, वासुदेव परब, तेजस शेगले बालकलाकार- कु.गोविंद गावडे, कु.प्रज्ञय नेमळेकर कु अनिरुद्ध मोर्ये, कु सोहम खरुडे आदी… सर्वच शिवप्रेमींचा या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार आणि खुप खुप कौतुक. ईतर ठिकाणी शबयच्या माध्यमातून गोळा झालेल्या निधीचा हा चुकीच्या पद्धतीने उपयोग केला जातो पण मांडकुली गावच्या युवकांनी एक वेगळा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला याचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे!