You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*१३) माझे गाव कापडणे…*

(विधीलिखित माहित असते तर ?)

 

कोणी केव्हा कुठे कसा जन्म घ्यावा हे कुणालाही माहित नसते. विधिलिखित म्हणतात ते हेच, पण ह्या कुठेतरी जन्म

घेण्याने परिस्थितीत जमिनअस्मानचा फरक

पडतो हे खरे नाही का? झोपडीत व महालात

जन्म घेण्यात हाच तर फरक आहे ना? विचारले असते तर कोणीच झोपडीत गेला नसता, पण विचारते कोण?

 

मला नेहमी वाटते, मी माझ्या ह्या कापडण्याच्या घरात जन्म घेतला नसता तर..?

आमच्या राहत्या घरासमोर हातावर पोटभरणारे कुटुंब रहात होते. तिथे जन्मली असती तर? बाप रे? कल्पनेनेही काटा येतो अंगावर.. कुठे माझे स्वातंत्र्य सेनानी वडिल व

कुठे ती पोटासाठी दिवसभर शेतात राबणारी,

रोजंदारी सालदारी करणारी माणसे व तुलनेने

रोज पोटभर भाकरी खाणारे शेतवाडी असणारे

सालदार ठेवणारे आम्ही! पण त्यांनी तरी ते जीवन निवडले होते का? नाही, ते त्यांच्या वाट्याला आले होते न मागता? मग आम्ही सुस्थितीत होतो हे आमचे नशिब का? त्यांनी

काय कुणाचे घोडे मारले होते? किंवा त्यांचे

प्रारब्ध काय होते हे तरी त्यांना कुठे ज्ञात होते? ना त्यांना ना आम्हाला! मग हा दैवाचा खेळ म्हणून सोडून दिला तरी त्रास होणाऱ्याला होतोच ना? त्याची कुठे सुटका होते, त्याचा दोष काय? हे ही त्याला माहित नसते मग असे का? हा प्रश्न मला नेहमी पडतो व बालपणीचे

ते दिवस आठवून जीव कासाविस होतो. कारण

त्या घरातच माझी समवयस्क व माझ्याशी

दररोज खेळणारी माझी मैत्रिण होती ना?सुमन

तिचे नाव.

 

मध्ये काही वर्षांपूर्वी आम्ही मुंबईला गेलो असता दादरच्या पुलावर ट्रेनसाठी उभे होतो. वरून दादऱ्यावरून एक दृश्य पाहिलेले इतक्या

वर्षांनंतरही माझ्या नजरे समोरून हटत नाही.एक भिकारीण, कडेवर मुल , खांद्यावर मुल. हातात जाड सामानाचे ओझे, जवळ दोन दोन वर्षांची असतील ती दोन मुले जी नुकतीच

चालायला शिकली असतील ती एक जड पिशवी एक एक नाडी पकडून उचलून चालत

होते. ज्यांना कडेवर घ्यावे ते न पेलवणारे ओझे वहात होते.

 

गरीबी माणूस मागत नाही ती न मागता वाट्याला येते ती कां? हा प्रश्न माझ्या घरासमोरच्या मैत्रिणी बाबत मला नेहमी पडतो कारण अवघ्या पंधराव्या वर्षी परकरात असतांनाच तिचे लग्न लावून दिले गेले. त्या

नंतर मी किती तरी वर्षे शिकत होते नि बिचारी

संसाराला लागली होती.नवरा काय वयाचा होता माहित नाही. पण मी धुळ्याला शिकायला आले नि ती मात्र संसाराला लागली.

पुढे गडबडीत भेटही झाली नाही.तीन भाऊ होते तिचे. आईचे नाव नबामाय. शेतात मजुरी करायची. व आमच्याघरी पण वेळी अडचणीला आईला मदत करायला यायची.

मी नेहमी पाय पोटऱ्या दुखल्या की तेल घेऊन

समोरच असलेल्या तिच्या (भाड्याच्या) घरात

जाऊन पोटऱ्या मालिश करून येत असे.आता

वाटते, तेव्हा तिचा हात दुखला नसेल काय?

तिचे भाऊ(आता नावे आठवत नाहीत)आलटून

पालटून आमच्या घरी सालदारकी करत असत.गरिबीत पडणारे वरील हे प्रश्न त्यांना पडले तरी विचारणार कोण? आणि उत्तर देणार कोण? आणि उत्तर देणार काय? सारेच प्रश्न अनुत्तरीत.गरीबी साऱ्यांनाच अनुत्तरीत करते.

 

समोरच घर असल्यामुळे परकरातील पाच सहा मुलींचा आमचा ग्रूप आमच्या शेजारच्याच

बाबाजींच्या देवडीत दिवसभर आम्ही भातुकली

विहिणी विहिणी बाहुल्याचे लग्न पायाला बाभळीच्या शेंगा बांधून जोडवे बनवणे, आमच्या घरी आईकडे पितळेचा सुंदर भांड्याचा सेट होता. अगदी सुबक छान छान

पोळपाट लाटण्यापासून सांडशी पर्यंत छान भांडी जी पुढे मामेबहिणीला दिली.असे गुळ चुरमुरे घेऊन शेंगदाणे घालून आम्ही खेळ खेळत असू. दिवस पुरत नसे. दुपारी मुद्दाम मला कुशित घेऊन आई आडवी व्हायची पण थोड्याच वेळात मी पसार होत असे.सुमन कुसुम इंदू असा पाचसहा जणींचा आमचा

ग्रूप होता. वाड्यात आम्ही आंब्याची कोय

बित्तू बित्तू म्हणून व चिंचोके खेळत असू. सागरगोटे खेळत असू.मागे पांढरीत जाऊन

साबरकांड्याची लाल फळे खाणे, असे आमचे

उद्योग चालत असत.

 

चांगल्या घरात जन्मल्यामुळे (किंबहुना नशिब

म्हणू या)बघा परिस्थितीत किती फरक पडतो.

ज्या काळात,”शिकिसन काय करनं से? वावरम्हाज जानं से नां?” अशा काळात वडिलांनी मला न शिकवता लग्न करून टाकले

असते तर? नाही, ते तर अत्यंत पुरोगामी विचार

सरणीचे होते, आम्हा चारही भावंडांना त्यांनी ही

शिक्षणाची संपत्ती बहाल करून खरेखुरे श्रीमंत

केले.. अन्यथा आज मी कुठे असते? विचारही

करवत नाही.काही असो, शिक्षणाचे पंख माणसाला मिळायलाच हवे, ठरवले तर काही

ही करता येऊ शकते, जसे मी लग्नानंतरही शिकले व आज तुमच्या समोर बडबड करते

आहे.मला वाटते अज्ञानाच्या गर्तेत पडण्या

पेक्षा हे बरे नाही का?

 

कालौघात इंदू गेली, कुसुम गेली, सुमनचे माहित नाही..एकत्र खेळणाऱ्या आम्ही पण..

आमच्या वाटा,रस्ते किती भिन्न होते पहा. मग

हे ही विधिलिखीतच म्हणायचे का? काही काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत हेच खरे आहे, म्हणतात, अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात. हेच बरोबर आहे.आता ही

ते अंगण, समोरच्या सुमनच्या अंगणात खेटून खेटून टाकलेल्या खाटा, चांदणी रात्र, खाटेवर

पडल्या पडल्या आम्ही मोजलेल्या चांदण्या,

ते हसणे खिदळणे, वाऱ्याने उडणाऱ्या आमच्या

अंगावरच्या गोधड्या नि सारे बघता बघता निद्रेच्या आधीन होणाऱ्या आम्ही …! कित्ती

सुंदर दिवस होते हो.. ना पैशाची चिंता ना खाण्या पिण्याची..! सारे कसे आपसुक मिळत

होते पण ते ही कळत नव्हतेच! ते ही किती छान

होते? सकाळी सकाळी बैलगाड्यांची दडदड खडखड सुरू झाली की गोधड्या आवरून घरात पळायचे..! नि माहित नाही, आई शाळेत

कशी पाठवायची? ते ही निटसे आठवत नाही.

काही काही ठळक घटनाच आठवतात फक्त.

असो.

“ कोई लौटा दे मेरे, बिते हुए दिन…

बिते हुए दिन वो मेरे प्यारे पले दिन..

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन …”

 

धन्यवाद मंडळी, भेटू पुढच्या रविवारी…

 

आपलीच,

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा