You are currently viewing डिटॅचमेंट

डिटॅचमेंट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

*डिटॅचमेंट*

—————————————

रोजचाच दिवस, रोजचीच सकाळ,  तीच धावपळ, तोच दिनक्रम. पण माझ्यासाठी आजचा दिवस वेगळाच होता. अडोतीस वर्षांपूर्वीही तो दिवस खास होता. पण तो  माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचा आरंभ होता. जीवनाची खर्‍या अर्थानं सुरूवात होती. माझ्या शिक्षणाचं, मी केलेल्या कष्टांचं जणू ते फळ होतं. रोज उठून रोजगाराच्या जाहीराती पाहणं, अर्ज करणं व प्रतिसादाची वाट पाहाणं हा प्रवास आजच्या दिवशी संपला होता. अर्ज, लेखी परीक्षा नंतरचे मुलाखतीचे सोपस्कर आटोपल्यावर आजच्या दिवशी अडोतीस वर्षापूर्वी बँकिंग सर्व्हीस रिक्रूटमेंट बोर्डाकडून (BSRB) मला अपाइंटमेंट लेटर मिळून एका राष्ट्रीयकृत बँकेत मला हजर व्हायचे होते. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाचं असतो, तो आनंद मला मिळाला होता. बँकेत लेटर घेऊन जाणे, अधिकार्‍यांनी सगळ्या पूर्तता झाल्यावर  कामावर रूजू करवून घेऊन मला काम सोपविणे, सगळं अद् भूत होतं माझ्यासाठी. आणि आज इतकी वर्षे इमाने इतबारे सर्व्हीस केल्यावर सेवानिवृत्तीचा दिवस आला होता. इतकी वर्षे या इन्स्टिस्टूटशी जोडलेली मी डिटॅच होणार होते.

आज रोजच्याप्रमाणे मी आॅफीसला जायला निघाले पण मनात एक वेगळीच हुरहुर होती. उद्यापासून हा दिनक्रम थांबणार होता. रोज घड्याळाच्या तालावर नाचणार्‍या मला एकदम रितेपण जाणवणार होतं. दिवसातील दहा दहा तास कामाच्या चक्रात फिरणारी मी आता या वेळेत काय करणार, या वेळेचं नियोजन कसं करणार ? या प्रश्नांनी वेढली होते.

 

“मॅडम आता कोठे घेऊ गाडी, मला रस्ता सांगा” मी तंद्रीतून बाहेर आले . “उजवीकडे घ्या”. रोज नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी मी , आजही नवीन आव्हान समोर आलं. आँटोरिक्षा, टॅक्सीवाल्याँचा आज संप होता. बँकेत वेळेवर पोहोचणं, डे बेगीन करणं, कॅश व सुरक्षा जमा कक्ष उघडणं, वेळेवर होणं गरजेचं होतं. रस्त्यावरून जाणार्‍या एका फोर व्हीलरला थांबवून त्या व्यक्तिला मी विनंती केली व त्याने मला इच्छितस्थळी पोहोचविले.

सेवानिवृत्ती नंतर मनसोक्त झोपायचं, आरामात उठायचं, वर्तमान पेपर वाचतांना चहाचा एकएक घोट घ्यायचा. आरामात आंघोळीला जायचं. किती किती छोटी स्वप्न असतात आपली नाही का ? पण रोजच्या धावपळीत, दगदगीत ती सुद्धा पूर्ण होत नाही. सेवानिवृत्तीनंतर आपण हे सगळं करूया, मी मनाशी खूणगांठ बांधलेली. आज ती वेळ आली होती, पण हे काय ? पक्ष्यांच्या चिवचिवाटासोबत मी पण उठून बसले, ते ही नेहमीपेक्षा लवकर. वर्तुळात फिरण्याची इतक्या वर्षांची सवय. हातही भराभर कामे करू लागलीत. स्वयंपाक आटोपला आणि सवयीने डबा भरायला घेतला, “अगं काय करतेस ? डबा काय भरतेस ? रिटायर झालीस ना तू काल ” यांच्या बोलण्याने मी भानावर आले. डब्यातलं अन्न पुन्हा पातेल्यांमध्ये काढलं.” इतकी वर्ष सोबत निभावलीस. माझ्यासोबत तू ही रिटायर झालास. तू ही अलिप्त झालास. डिटॅच झालास ” मी हातातील डबा न्याहाळत होते. डबा सिंकमध्ये ठेवला आणि मी गॅलरीत आले .तुळशी चांगली बहरली होती. असं निवांतपणे मी तुळशीला कधी न्याहाळलंच नव्हतं. तुळशीने मंजिर्‍या खूप धरल्या होत्या. ” मंजिरी वाढली म्हणजे तुळशीचं लाईफ कमी होतं. म्हणून मंजिर्‍या वरचेवर खुडाव्यात, तुळशी पुन्हा बहरायला मदत होते” आईचे बोल आठवले व मी तुळशीच्या मंजिर्‍या खुडू लागले. देवघरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मंजिर्‍या वाहिल्या.

दुपारचा एक वाजला आणि आॅफीसमधील लंचब्रेक मला आठवला .आज मला हे काय होतंय .? सेवानिवृत्तीपूर्वी माझी तीन महिने शिल्लक असलेली रजा मी एंजाॅय करत होते, तेव्हा मला अशी हुरहुर कधीच वाटली नाही. हो त्याला कारणंही तसंच होतं म्हणा, मी अजून त्यांच्याशी जोडलेली होते.

हा काय पहिला बदल होता का आयुष्यातला ? नाही ना . प्रत्येक वेळी जुळवलंच ना आपण . प्राथमिक शिक्षण झालं आणि हायस्कूलला प्रवेश घेतला . जुनी शाळा , मैत्रिणी , शिक्षकवर्ग सगळ्यांचा निरोप घेतांना डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली .आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटवस्तू देत , पुनःपुन्हा भेटीचं आश्वासन देत डिटॅच झालो .पण नवीन शाळा , नवीन मैत्रिणी आणि पुढे शिकण्याची जिद्द , यांनी नवऊर्जा दिलीच की .

हाच परीपाठ हायस्कूल सोडतांना , पुढे महाविद्यालय सोडतांना , मनाला हुरहुर लावणारा घडत गेला . एकीकडे डिटॅच होतांना दुसरीकडे अँटचही होत गेलेलो आम्ही . पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकत होतो . नवी उमेद , नवी आशा आणि जुन्याने दिलेल्या असंख्य आठवणींचा खजिना सोबतीला घेऊन मार्गक्रमण होतंच राहिलं .

आठवणींच्या या चलचित्रात मला आठवलं माझं सगळ्यात मोठं डिटॅचमेंट . माझं लग्न . ज्या घरात माझा जन्म झाला , मी लहानाची शहाणी झाले . आई वडिलांच्या छायेत वावरले , भावंडांच्या सोबतीने खेळले , कधी भांडले , रूसवे फुगवे धरले , यांना सगळ्यांना सोडून नव्या घरी , नवीन माणसांसोबत राहाणं , तेथील रितीरिवाज , घरातील प्रत्येकांचे स्वभावदोष जाणून त्यांच्याशी जुळवून घेत , त्यांची मर्जी राखणं , सासूचा तोरा , दीर जावांचा हेवादावा ,नणंदेचे टोमणे सहन करत संसारगाडी हाकायची , अजबच होतं . माहेर सुटलं , अगदी ”

तदेव लग्नं सुदिनं तदेव

ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।

 

म्हणताबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहु,णी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं. निसर्गकन्या बहीणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

 

” देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते ”

 

या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती.

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता . ” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . “चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले. निदान मुलगी भारतीय असावी, आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही माझी भोळी आशा. मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या”.

“आई तुला हा त्रास कशाला, मी शोधलीय तुझी सून. नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .”

माझं स्वप्न भंगलं, पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला.

मुलं घरट्यात विसावली, उरलो आम्ही दोघेच. सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

“अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे. चल लवकर, जाम भूक लागलीय मला ” ” होय चला, जेवण करून घेऊ या.”

सुनीता रिलॅक्स, अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख, रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही. उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा. स्वतःसाठी जगायचं. आपल्या इच्छा पूर्ण करायच्या, आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले. झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला. कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते “हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे. या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं, हे माझं ची वीण घट्ट होत जाते. माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात. जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो. म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .

नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग ”

” होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे. निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लीत झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

——————————————————————

डाॅ. शैलजा करोडे ©®

नेरुळ नवी मुंबई

मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा