ॲलेक्सा कुत्र्याचा आवाज काढ…
13 वर्षाच्या मुलीच्या प्रसंगावधानामुळे वाचला चिमुकलीचा जीव
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने केलेली प्रगती ही दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त ठरत असते. अशाच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एका चिमुकलीचा जीव वाचला. उत्तर प्रदेशमधील बस्ती येथील विकास कॉलनीमध्ये १३ वर्षांच्या निकिता हिने असं काही केलं की, ज्याबाबत ऐकून सारेच अवाक झाले.
निकिता हिने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे केवळ तिचेच नाही तर १५ महिन्यांच्या एका चिमुकलीचेही प्राण वाचले. आधुनिक यंत्राचा योग्य वापर करून कुठल्याही संकटातून मात करता येऊ शकते, हे तिने दाखवून दिले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विकास कॉलनीमधील आपल्या बहिणीकडे गेलेली निकिता ही तिच्या १५ महिन्यांची भाची वामिका हिच्यासोबत खेळत होती. पहिल्या मजल्यावर असलेल्या किचनजवळीत सोफ्यावर दोघीही जणी खेळत होत्या. घरातील इतर व्यक्ती दुसऱ्या खोलीत होत्या. त्याचवेळी माकडांची एक टोळी घरात घुसली. त्यांनी किचनमधील भांडी कुंडी तसेच इतर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. मकडांच्या या आक्रमक टोळीला पाहून या दोघीही जणी घाबरल्या.
छोटी वामिका घाबरून रडू लागली. तर निकिताही भेदरली. दरम्यान, एक माकड निकिताच्या दिशेने येऊ लागला. तेवढ्यात तिचं लक्ष फ्रिजवर ठेवलेल्या ॲलेक्साकडे गेलं. तिने क्षणाचाही वेळ न दवडता ॲलेक्सा कुत्र्याचा आवाज काढ अशी आज्ञा दिली. ही आज्ञा मिळताच ॲलेक्साने कुत्र्याचा भो-भो आवाज काढण्यास सुरुवात केली. कुत्र्याचा आवाज ऐकून माकड घाबरले आणि बाल्कनीमधून छताच्या दिशेने पळाले. दरम्यान, ॲलेक्साचा इतका चांगला वापर होऊ शकतो, याचा आम्ही विचारच केला नव्हता, असे कुटुंबातील प्रमुख पंकज ओझा यांनी सांगितले.