भुईबाववडा घाटातील निर्जीव दगडांना जिवंतपणा आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनोखा उपक्रम
कार्यकारी अभियंता, अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पनेतून दगडांवर पशु ,पक्षी,प्राणी यांचे चित्र रेखाटण्याचे काम
कणकवली
वैभववाडी तालुक्यातील भुईबाववडा घाटातील निर्जीव दगडांना जिवंतपणा आणण्यासाठी सा बां विभागाकडून अनोखा प्रयत्न केला जात आहे.कार्यकारी अभियंता, अजयकुमार सर्वगोड यांच्या संकल्पनेतून दगडांवर पशु ,पक्षी,प्राणी यांचे चित्र रेखाटण्याचे काम कुडाळ येथील ओरिगो या संस्थेमधील कलाकारांमार्फत सदरचे काम केलं जात आहे.
सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटमार्गांमधील भुईबावडा घाट रस्ता हा एक महत्वाचा रस्ता आहे. मागील सुमारे दोन महिन्यापासून वैभववाडी व गगनबावडा यांना जोडणारा करुळ घाट रस्ता बंद पडल्यापासून या भुईबावडा घाटमार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खारेपाटण, भुईबावडा मार्ग तसेच भुईबावडा -गगनबावडा घाट हा मागील अनेक वर्षापासून अरुंद व अत्यंत दुरावस्था झालेला मार्ग होता. सन 2022- 23 व 2023-24 या वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांचे कडून सदर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन पुढे करण्यात आले असून आता खारेपाटण ते भुईबावडा या रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरणासह पूर्ण झाली आहे. भुईबावडा घाटातही रुंदी करणाचे काम झाले असून डांबरीकरणाचे काम आता प्रगती पथावर आहे. लवकरच हा पूर्ण रस्ता रुंद व चांगल्या पृष्ठभागाचा झालेला दिसून येणार आहे.
भुईबावडा घाटाच्या रुंदी करणाचे काम सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाट रस्त्यानजीक असणाऱ्या मोठया-मोठया दगडांवर विविध पशु पक्षी प्राणी यांचे चित्र रेखाटण्याचे काम सुरू केले आहे. कुडाळ येथील ओरिगो या संस्थेमधील कलाकारांमार्फत हे काम करण्यात येत आहे. निर्जीव घाट रस्त्यांमधून जात असताना लोकांचा विरंगुळा व्हावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक येत जात असताना घाट रस्त्याचा आनंद मिळवता यावा याच हेतूने सार्वजनिक विभागाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व वाखाणण्याजोगा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर अशा स्वागतचित्रानी मन प्रसन्न होईल यात शंका नाही. कार्यकारी अभियंता, अजयकुमार सर्वगोड उपविभागीय अभियंता, विनायक जोशी व कनिष्ठ अभियंता शुभम दुडये यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. त्याबद्दल सर्व सामान्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.