“ते *लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे मी मात्र मागे वळूनी पाहतो मागे कितीजण राहिले*” ह्या कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या ओळी प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा माणूस म्हणजे विजय राऊत. या माणसाने खऱ्या अर्थाने अमरावतीवर व अमरावतीच्या मातीवर प्रेम केलेले आहे व करीत आहे.अमरावतीच्या संस्कृतीचा साहित्यिकाचा कलावंतांचा प्रतिभावंतांचा समाजसेवकांचा विकास झाला पाहिजे हे हृदयात ठेवून त्यांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने तन-मन-धनाने काम करणारा झिजणारा माणूस म्हणजे विजय राऊत आहे . खरं म्हणजे विजयरावाची पाळंमुळ मुंबईत घट्ट रुजलेली आहेत. महाराष्ट्रात नवे भारतात गाजत असलेले सर्वात मोठे नेते मा. राज ठाकरे त्यांचे जवळचे जिवलग मित्र आहेत .बॉम्बे आर्ट सोसायटीच्या निवडणुकीत जगप्रसिद्ध कलावंत लोकांचा पराभव करून ते बॉम्बे सोसायटी ह्या विश्वव्याख्यात संस्थेत निवडून आलेले आहेत .पण म्हणतात ना: घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी : या न्यायाने त्यांनी अमरावतीच्या भूमीशी इमान राखले आहे .मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो. चर्चा करतो .तेव्हा माझ्या लक्षात येते की हा माणूस दृष्टी असलेला माणूस आहे. त्यांच्या ठिकाणी आपल्या मातृभूमीविषयी तळमळ आहे. मी अमरावतीचा आहे .मी अमरावतीसाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते अमरावतीकडे पाहतात. खर म्हणजे पुण्या मुंबईला व परदेशात गेलेली मुलं अमरावतीत परत येत नाहीत. ते तिकडचीच होऊन जातात. पण विजय राऊत मात्र याला अपवाद आहे. मुंबईत चांगला नावलौकिक असताना . चांगला जम बसलेला असताना चांगले दणाणून टाकणारे राष्ट्रीय राजकीय मित्र असताना आणि कलेला मुंबईला आंतरराष्ट्रीय मार्केट असताना या माणसाची पावलं मात्र अमरावतीकडे वळलेली आहेत .हा माणूस प्रामाणिक आहे आणि म्हणूनच तो आज अमरावती शहरातील सुखी माणूस आहे. भरपूर पैसा असला भरपूर संस्था असल्या म्हणजे माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. आनंदी होऊ शकत नाही .माणूस खरा आनंदी होतो तो जमिनीवर चालल्यामुळे .जमिनीवर राहिल्यामुळे जमिनीच्या वर अहंकाराने आकाशात फिरणारी माणसे केव्हा जमीनदोस्त होतील हे सांगता येत नाही. या माणसाने अमरावती शहरात वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वी करूनही दाखविले .या माणसाचा चांगलानावलौकिक आहे . त्यांचे
कोणतेही बोलणे हृदयापासून आहे. कोणतीही कृती मनापासून आहे. त्यात देखावा नाही . कृत्रिमता नाही. माझी विजय राऊत यांची ओळख त्यांच्या वडिलांमुळे झाली .त्यांचे वडील म्हणजे राऊत गुरुजी. प्रामाणिकपणे वृद्धाश्रम चालविणारा माणूस .राऊतगुरुजी आमच्या परिवारातील बाबासाहेब सोमवंशी रा.ना.पांडे,अं ना पांडे या आमच्या शिक्षक संप्रदायातील मित्रांमुळे राऊत गुरुजी जवळ आले आणि त्यांच्या माध्यमातून परिचय झाला तो विजय राऊत सरांचा .आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समोरच त्यांचे ॲनिमेशन कॉलेज आहे .हे नुसतं ॲनिमेशन कॉलेज नाही आहे .तर अमरावतीच्या सांस्कृतिक उलाढालीचे केंद्र आहे .जिथे गावात तुम्हाला सभागृहासाठी ध्वनी व्यवस्थेसाठी पैसे मोजावे लागतात तिथे विजय राऊत यांचे ॲनिमेशन कॉलेज चांगल्या कामासाठी त्यांच्या सगळ्या स्टाफसह त्यांच्या सगळ्या सुविधांसह तुम्हाला विनामूल्य उपलब्ध आहे. विजयरावांनी आपल्या महाविद्यालयाची दारे अमरावतीकरांसाठी कलावंतांसाठी साहित्यिकांसाठी कवींसाठी मोकळी केलेली आहेत. या आणि तुमची कला सादर करा. आम्ही काय मदत करू शकतो ते आम्हाला सांगा. हे सांगणारा माणूस व आपले महाविद्यालय लोकाभिमुख करणारा माणूस म्हणजे विजय राऊत. अमरावतीमधले पहिले जिवंत कलादालन या माणसाने तयार केले आहे. त्यांची तळमळीची इच्छा आहे की अमरावती जिल्ह्यात विदर्भात भरपूर कलावंत आहेत. पण आपल्या भागातून त्यांना प्रोत्साहन मिळत नाही .आर्थिक दृष्ट्या मदत मिळत नाही. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. मग अशा कलाकारांना एकत्र करून त्यांच्यासाठी दुसरा कोण काय करते त्यापेक्षा मी काय करू शकेल या न्यायाने ते पणतीप्रमाणे झिजत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यश आलेले आहे. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील त्यांचे महाविद्यालय म्हणजे आगळे वेगळे व नोंदणीय महाविद्यालय आहे असे मी विधान केले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही .लोक खूप भेटतात. प्राचार्य खूप भेटतात .संस्थाचालक खूप भेटतात. पण माणसे भेटत नाहीत. आणि म्हणूनच विजय राऊतांचा मला गौरव वाटतो
.अभिमान वाटतो .त्यांचे अधून मधून मला फोन येतात.मीही त्यांना फोन करतो. आमचा एकच विषय असतो .अमरावतीचा विकास .कालपरवा त्यांचा फोन आला. मुंबईच्या जहागीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या एका विद्यार्थिनीचे प्रदर्शन भरवायचे होते. मी लगेच माझी मंत्रालयातील यंत्रणा कामाला लावली आणि विजयरावानी सांगितलेले काम पटकन करून दिले. एवढेच नव्हे तर त्या कलावंताला परदेशात पाठविण्याची देखील व्यवस्था मी मंत्रालयातील मित्रांच्या मदतीने करून दिली. त्या कलाकाराला मी अजूनही भेटलो नाही आणि भेटण्याचे कारणही नाही. कारण विजय राऊत ज्यांचं नाव सांगतील ते योग्य व गरजू व्यक्तीचे नाव सांगतील याची मला पूर्ण खात्री आहे .हा माणूस बसल्या बसल्या तुमचे चित्र काढतो. तुम्ही त्यांना भेटायला गेले तर ते तुमच्याशी बोलत असतील पण त्यांची पेन्सिल सुरूच असेल आणि तुमच्या बोलण्यामध्ये ते मग्न असतात तसेच चित्र काढण्यातही मग्न असतात आणि तुमचे बोलणे संपले की तुमचे चित्र ते तुमच्यासमोर ठेवतात .इतका हा कलावंत माणूस .बोलता बोलता चित्र काढणारा. हे चित्र केवळ ते कागदावर काढत नाहीत तर तुमच्या हृदयाच्या पटलावर काढतात आणि हृदयापासून काढतात. मला आठवते विजय राऊतांच्या अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला एवढी प्रचंड गर्दी असते की तेवढी प्रचंड गर्दी फार कमी कार्यक्रमाला पहावयास मिळते .स्टेजवर एकीकडे पुतळे बनवणे सुरू असते. एकीकडे चित्र काढणे सुरू असते. तर एकीकडे काव्यवाचन असा हा त्रिमितीचा कार्यक्रम यशस्वी करावा तो विजय राऊतांनीच . आजकाल सांस्कृतिक भवनमध्ये कार्यक्रम घेणे आणि तोही हाउसफुल करून दाखवणे ही तारेवरची कसरत आहे. परंतु विजय राऊतांनी ते शिवधनुष्य पेलले आहे. त्यांनी ज्या तंत्राचा वापर केलेला आहे त्या तंत्रामुळे सांस्कृतिक भवनामध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. लोकांच्या मनामध्ये कलावंत दडलेला आहे .चित्रकार दडलेला आहे .कवी दडलेला आहे. पण तो कलावंत त्यांना व्यक्त करता येत नाही आणि म्हणून जे व्यक्त करतात ते श्रेष्ठ ठरतात. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे : आणिल आरतीला हे चंद्र सूर्य तारे : या कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या कवितेतील ओळीने ते आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडत आहेत आणि त्यांचा हा ऋण फेडण्याचा प्रयत्न तन-मन-धनाने आणि हृदयापासून आहे .म्हणून या अमरावतीवर मनापासून प्रेम करणाऱ्या ह्या दर्दी माणसाला कलावंत माणसाला आणि त्यांच्या ठिकाणी असलेल्या माणुसकीला मनापासून प्रणाम.
==============
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
आय ए एस मिशन
अमरावती कॅम्प 9890967003