You are currently viewing रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडेच, कोणीही मध्ये लुडबूड करु नये

रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडेच, कोणीही मध्ये लुडबूड करु नये

 नारायण राणेंचा थेट इशारा

 

सिंधुदुर्ग :

 

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गट या महायुतीतही जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. कोकणातील लोकसभा मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मित्रपक्षांनाच इशारा दिलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागेवर आजही आमचा दावा आहे, असे विधान शिंदे गटाकडून करण्यात आले होते. त्यामुळे आता महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन आलबेल नाही, हे सिद्ध झालंय.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपकडेच, कोणीही मध्ये लुडबूड करु नये, असा थेट इशाराच नारायण राणेंनी दिलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा भाजपचीच आहे. तिथे कोण लढणार हे पक्ष ठरवेल. मला जर पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढवेन, असे नारायण राणेंनी म्हटले. रत्नागिरीतील लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकलाय. शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी लोकसभेच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी केली आहे. ही जागा सामंतांच्या वाट्याला जाईल, असे वाटत असताना नारायण राणेंनी केलेले विधान महत्वाचे मानले जात आहे.

मी तिकीट मागायला गेलो नाही. बातम्या देताना विचार करा.माझं नाव जाहीर झाल्यास मी निवडणूक लढवले आणि जिंकेल, असे राणे यावेळी म्हणाले. कुणीही बैठक मेळावा बोलवू देत. काही होत नाही.दहीकाल्याप्रमाणे बैठक होत राहतात. शंकासुर कोण असेल माहित नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.आम्ही मतदारसंघ सोडणार नाही, असा पुनरोच्चार त्यांनी यावेळी केला.

मला राजकारणात ५६ वर्षे झाली आहेत, मला कुणी काहीही सांगितलेलं नाही. माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. मतदारसंघाचा माझा अभ्यास आहे. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार, असं मी नड्डा यांना सांगितलंय. माझ्या नेत्यांनी मला काय सांगितलं ते गोपनीय असून ते मी सांगणार नाही, असे राणे म्हणाले. उद्यापर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर होईल, असे महत्वाचे विधानही नारायण राणेंनी यावेळी केले.

एकीकडे ‘रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागा आमचीच’ असे म्हणत शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. महायुतीत काही वाद नसून, एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले होते. महायुतीने नारायण यांच्या नावाची घोषणा केली तरी आम्ही युती म्हणून त्यांचं काम करु. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागेवर आजही आमचा दावा आहे. ती जागा शिवसेनेला मिळावी असा आमचा आग्रह आहे. नारायण राणे यांचा मानसही दिसतोय. पण वरिष्ठ निर्णय घेईपर्यंत आम्ही काही बोलणार नाही,” असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =