You are currently viewing जिव्हाळा

जिव्हाळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*जिव्हाळा*

 

पाहिली खोट्या जिव्हाळ्यांची हुशारी

भेटती आमंत्रणेही टाळणारी!

 

गझल सम्राट सुरेश भटांच्या या ओळी मनाला आणखीनच स्पर्शून जातात जेव्हा या मनस्थितीतून जात असताना अचानक आपल्या नजरेसमोर येतात. संकटं, आपत्तीच्या काळातच खरे मित्र कोण ते कळतं असं म्हणतात. तसंच अडचणीच्या काळात सुंदर चेहऱ्यांमागील खरी विद्रुपता आणखीनच भयानक होत जाते हेही तितकंच खरं. आपण समजत असतो की माणसाच्या आतला माणूस जिवंत असणारच, तो अशा नाजूक वेळी सर्व गोष्टींना मागे सारून स्वतःचं माणूसपण सिद्ध करेल. आलेल्या संकटात ताउन सुलाखून नाती नव्याने निखरून येतील, एकमेकांचा आधार मिळेल. पण बहुतांश वेळा या अपेक्षा फोल ठरतात.माणसाच्या आतल्या ओंगळवाण्या पशूचे अस्तित्व तो स्वतःच्या कृतीतून पदोपदी दाखवून देतो. तो किती नीचपणाची पातळी गाठू शकतो याची तुम्ही आम्ही सामान्यपणे कल्पनाही करू शकणार नाही. असं वाटतं की ही सगळी हवा विषारी होते आहे. कशामुळे? का? असं असावं का की माणसाच्या आतले पशू जागे होतात तेव्हा हवा विषारी होते? किंवा कदाचित हवा विषारी झाल्यामुळे आतले पशू जागे होतात?अशा मनःस्थितीत यातले बारकावे शोधू जाता सापडतील तरी कसे?वाटतं की हे कळणंही आपल्या आवाक्या बाहेरचं आहे.

 

भट साहेबांचेच काही शेर मला यावेळी आठवतात की,

आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी

मी बोलताच माझी केली शिकार त्यांनी!

त्यांच्या समान येथे नाही कुणी विचारी

आजन्म फक्त केला त्यांचा विचार त्यांनी!

 

या शेरातून ही बोचरी खंत अगदी ठळकपणे उजागर होते आहे. आपल्या चांगुलपणाचा अंती काहीही उपयोग होत नाही जेव्हा समोरची व्यक्ती आपला यत्किंचितही विचार करत नाही. ती त्याच्याच मस्तीत धुंद असते. अगदी माणूस म्हणूनही त्यांच्या लेखी आपण शून्य असतो तेव्हा नैराश्याचे ढग मनाला झाकोळून टाकतात. आणखी वर त्यांची बाजू ते ठळकपणे, निर्लज्जपणे जगासमोर मांडून आपल्या कृतीचं समर्थनही करत असतात.

भटसाहेबांनी ही मनोवस्था किती परिणामकारकतेने आपल्या शेरात मांडली आहे बघा,

 

हरेक वेळी तुला दिली दूषणे,जगा, मी,

हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता!

अखेर गावामधून त्या मी निघून गेलो

तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता!

 

खरंय ना,अशा लोकांच्या पदरात त्यांची चूक घालायला जाणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेणेच आहे. आपलेच हात आगीत होरपळून घेणे आहे. मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे या परिस्थितीत एकतर मौन पाळणे किंवा दूर जाणे. कारण जी गोष्ट आपण बदलू शकत नाही तिच्यापासून लांब राहणेच हिताचे हे स्पष्ट आहे. आणि आपल्या दूर जाण्याने कुणाला काहीही वाटणार नसते.

एवढ्या मोठ्या ब्रम्हांडातला एक य:कश्चित ठिपका म्हणजे आपलं अस्तित्व. आपण म्हणजे कोणीच नाही अशी दूषणे स्वतःलाच देत रहायचं.

मग पुन्हा सुरेश भटांचे शब्दच मनात रुंजी घालत रहातात की,

 

कुणी न हेलावले, कुणी ढाळले न आसू..

खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता!

 

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 7 =