केणीवाडा रस्त्यावर सुरू असलेले नित्कृष्ट डांबरीकरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले
बांदा
मडुरा-पाडलोस मार्गावरील केणीवाडा येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरणचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरू आहे असा आरोप करीत आक्रमक ग्रामस्थांनी काम रोखले.
रस्ता कामास कोणताही विरोध नसून दर्जेदार असावे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणी त्यानंतर काम सुरू करावे अशी मागणी केली.
आज सकाळी ठेकेदाराने सुरू केलेल्या कामाची ग्रामस्थांनी पाहणी केली. यादरम्यान डांबरचा वापर कमी होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य गणपत पराडकर, युवासेना विभाग प्रमुख समीर नाईक, सामाजिक कार्यकर्ते महादेव नाईक, बंटी नाईक आदी उपस्थित होते.
गणपत पराडकर म्हणाले की, अधिकारी रस्त्यावर उभे राहून काम करून घेत नसल्याने ठेकेदारांचे फावले आहे. केणीवाडा रस्त्यावर सुरू असलेले डांबरीकरण काम हे नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी नव्याने केलेल्या डांबरीकरणच्या खालील जुना रस्ता दिसू लागला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक पाहावे व काम दर्जेदार करून घ्यावे. आमचा कामास कोणताही विरोध नसल्याचे गणपत पराडकर यांनी सांगितले.