डॉक्टर लोकांचे आपण बरेच किस्से ऐकत असतो. बरेच प्रसंग असे असतात की त्यामध्ये डॉक्टरांवर दोषारोपण केले जाते. पेशंट वर उपचार न केल्यामुळे किंवा पेशंट दगावल्यामुळे डॉक्टर लोकांवर आणि हॉस्पिटलवर दगडफेक हाणामारी झाल्याच्या घटना आपल्या लक्षात आहेत. पण काही डॉक्टर असे असतात की ते आपल्या वेगळेपणामुळे निश्चितच रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या हृदयात शिरतात .अशाच एका डॉक्टरांचे नाव आहे डॉ. नवीन चौधरी .अमरावतीच्या राजापेठ भागातील बुटी प्लॉटमधील गुरुद्वाराजवळ त्यांचा दवाखाना आहे. दवाखान्याचे नाव आहे चौधरी हॉस्पिटल. डॉ. नवीन चौधरी आणि डॉ. सुप्रिया चौधरी हे हा दवाखाना सांभाळतात. या डॉक्टरांबद्दल लिहिले तेवढे कमीच होईल .माझा त्यांचा अजिबात परिचय नाही. पण परिचय नसतानाही या माणसाने आम्हाला दिलेला दिलासा दिलेली माणुसकीची वागणूक आमच्या आयुष्यात न विसरण्यासारखी आहे . त्याचे असे झाले की माझ्या मोठ्या भावांची नात कुमारी परिजा स्वप्नील काठोळे ही 22 तारखेला लपाछपी खेळताना तुळशी जवळील दिव्याने पेट घेऊन ती ७० टक्के जळाली . मी तेव्हा मुंबईला होतो. माझ्या पुतण्याने स्वप्नीलने डॉ. अद्वैत महल्ले यांना फोन केला .ते त्यांच्या परिचयाचे आहेत. त्यांनी स्वप्निलला डॉ. नवीन चौधरींचे नाव सांगितले. स्वप्निल परिजाला घेऊन डॉ. नवीन चौधरींकडे गेला.माझी सुनबाई डॉ पायल रोकडे हिला फोन कऱून जेव्हा कळविले तेव्हा योग्य डॉ. कडे नेल्याचे ती बोलली . तिचा अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येमध्ये डॉक्टरांसोबतचा काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.तिनेही डॉक्टरांशी चर्चा केली. ७० टक्के जळालेल्या रुग्णाला सहसा डॉक्टर लोक भरती करींत नाहीत. ते जिल्हा रुग्णालय ; डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल किंवा नागपूरचा सल्ला देतात .पण डॉक्टरांनी तसे केले नाही .लगेच ऍडमिट केले व उपचाराला सुरुवात केली. मी लगेच मुंबईवरून आलो. डॉक्टरांनी मला बोलावले. ते म्हणाले सर पेशंटला नागपूरला हलविलेले चांगले राहील .नागपूरचे वैद्यकीय महाविद्यालय हे जळलेल्या रुग्णांसाठी अतिशय चांगले आहे. मी माझ्या परीने पूर्ण ट्रीटमेंट करीत आहे. परंतु त्याला मर्यादा आहेत .पेशंट आता चांगल्या परिस्थितीत आहे .अशा परिस्थितीत तुम्ही पेशन्ट ला नागपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविलेले चांगले राहील. तो होळीचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी .मी डॉक्टरांना म्हटले डॉक्टर साहेब दोन-तीन दिवसात हलविले तर नाही चालणार का ? डॉक्टर साहेब म्हणाले तुम्ही उद्या सकाळीसच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गेलेले उत्तम राहील .माझा हा सल्ला आहे . डॉक्टरांचे माझे बोलणे झाले तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. सगळीकडे होळी पेटली होती .डॉक्टर म्हणाले जितक्या लवकर हलवाल तितके चांगले राहील .मी डॉक्टर म्हणून सांगतो. माझ्याकडे सगळ्या सोयी आहेत .परंतु जळलेल्या पेशंटला कोणत्या वेळेस काय होईल ते काही सांगता येत नाही आणि तेवढ्या सुविधा फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आहेत .तिथे सर्व डिपार्टमेंट आहेत .मी लगेच नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांना एसएमएस करून परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांना या कामात मदत करण्यास सांगितले .त्यांचा लगेच मला फोन आला .त्या म्हणाल्या नरेशजी आप कल सवेरे पेशंट को ले आईये. मैने मेडिकल कॉलेज के डीन डॉक्टर राज गजभिये साहबसे बात कर ली है .उन्होने पेशंट के लिये अनुमती दे दी है ..कमिशनर मॅडमचा निरोप आल्यानंतर आणि प्रत्यक्ष फोन आल्यानंतर मला हायसे झाले. मी सर्वांना सकाळी सहा वाजता निघण्याच्या सूचना केल्या. डॉक्टर साहेबांना त्यांच्या फीसबद्दल विचारले .कारण की पेशंट त्यांच्याकडे तीन दिवस ऍडमिट होता .डॉक्टर नवीन चौधरी यांनी विनम्रपणे नकार दिला .ते म्हणाले सर तुम्ही मला परिचित आहात. स्वप्निल माझ्याशी परिचित आहे. तुम्ही अगोदर पेशंटची काळजी घ्या. माझ्या बिलाची काळजी करू नका .तुम्ही अमरावतीत राहता . मीही अमरावतीतच राहतो. तुम्ही नागपूरला जाऊन पेशंट चांगला झाल्यानंतर आपण आपला हिशोब करू .मला धक्का बसला. हे अनपेक्षित होतं. अनेक डॉक्टर मृत झालेल्या व्यक्तीचे पूर्ण पैसे भरल्याशिवाय डेड बॉडी देत नाहीत .अशा बऱ्याच केसेस आहेत आणि हे डॉक्टर तर चक्क बिल नको. नंतर द्या असे म्हणत होते आणि बील तीन दिवसाच्या औषधोपचाराचे होते .पण आम्ही त्यांना आग्रह धरला. डॉक्टरसाहेब पेशंटला तुम्ही तीन दिवस ट्रीटमेंट दिलेली आहे. तुमचे बिल तुम्ही आम्हाला सांगा .आम्ही पेमेंट करूनच नागपूरला जातो. तरीही डॉक्टर मानले नाहीत .ते म्हणाले .नागपूरला तुम्हाला बराच खर्च येणार आहे. मी या गावातच आहे. माझे पैसे तुम्ही केव्हाही देऊ शकता .ते असे म्हणाले की पेशंट जेव्हा आला तेव्हा त्याची परिस्थिती पाहून दुसरा कोणत्याही डॉक्टरनी कदाचित नकार दिला असता. पण तुमचा पुतण्या स्वप्नील माझ्या परिचयाचा आहे. त्याची परिस्थिती मला माहीत आहे. आणि म्हणून मी ही रिस्क घेतली. पेशंट आता सुस्थितीत आहे आणि अशा सुस्थितीतच त्याला जर हलविल्या गेले तर अधिक चांगले राहील. आम्ही सर्वांनी तयारी केली आणि सकाळी सहा वाजता निघायचे ठरविले . डॉक्टर नवीन चौधरींना मी पहिल्यांदाच भेटत होतो. कदाचित ते मला ओळखत असावे. माझा स्वभाव त्यांना माहीत असावा .आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचलो . डीन डा.श्री राज गजभिये यांनी वार्ड नंबर चार मध्ये सर्व सूचना देऊन ठेवल्या होत्या. आम्ही वाटेत असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर कार्यालयातून श्री अमर सुरवाडे यांचा फोन आलेला होता. किती वाजता पोहोचत आहात म्हणून त्यांनी विचारले होते.आम्ही वार्डात पोहचताच ताबडतोब परिजावर उपचार सुरू झाले. आता पेशंट चांगला आहे. प्रगतीपथावर आहे. सकारात्मक आहे .पण या पेशंटला ऍडमिट करून घेण्याचे त्याच्यावर उपचार करण्याचे तसेच माझे बिल तुम्ही नंतर द्या असे म्हणणारे डॉ. नवीन चौधरी व डॉ. सुप्रिया चौधरी माझ्या नव्हे आमच्या काठोळे कुटुंबाच्या दीर्घकाळ लक्षात राहतील.ह्या साध्या सरळ कृतीशील परोपकारी डॉ.नवीन चौधरी यांना माझा मनापासून मानाचा मुजरा…
=============
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस अमरावती
9890967003