करिअरसाठी योग्य मार्ग निवडा : प्रकाश जैतापकर
पणदूर महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात साजरा
कुडाळ
महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअरसाठी अनेक मार्ग खुले असतात त्यामधून योग्य तो मार्ग निवडून तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हा असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष व दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे उपाध्यक्ष श्री प्रकाश जैतापकर यांनी केले.
पणदूर महाविद्यालयात एप्रिल २०२२-२३ च्या मुंबई विद्यापीठ परीक्षेत बँकिंग इन्शुरन्स, कॉमर्स, बी.एस्सी आयटी, व संगणकशास्त्र, या शाखांमध्ये उत्तीर्ण पदवीधारक विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान समारंभ बुधवार दिनांक २७ मार्च २०२४ रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव डॉ. अरुण गोडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कोविड काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाबद्दल साशंकता निर्माण झालेली होती. परंतु त्याकाळातही तितक्याच ताकतीने ऑनलाईन शिक्षण देणारे प्राध्यापक व ऑनलाईन शिक्षण आत्मसात करून यश मिळविणारे आजचे पदवीधारक विद्यार्थी यांचे प्राचार्य शिंदे यांनी कौतुक केले व धन्यवाद दिले. या महाविद्यालयाला उभारी देणारे कै. शशिकांत अणावकरसर यांच्या मनातील नॅक मूल्यांकनाचे स्वप्न काही दिवसातच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. तसेच गेली दोन वर्षे आपल्याला या महाविद्यालयाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कै.शशिकांत अणावकर सर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. महाविद्यालयीन शिक्षण संपले असले तरी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला इथेच पूर्णविराम न देता पुढे उच्च शिक्षण घेऊन आपले करिअर घडविण्याचा मौलिक सल्ला सचिव डॉ अरुण गोडकर यांनी पदवीधारकांना देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ च्या विद्यापीठ परीक्षेत एकूण ५४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पदवीधारक ठरले. सदर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. पदवीधारक कु. सायली गावडे, कु. कृष्णा गोसावी, कु. दिव्या हळदणकर, कु.वैष्णवी परब, कु. निधी बागवे, कु. संपदा पालव यांनी मनोगतातून महाविद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले. कोविड काळामध्ये सुद्धा आपल्याला या महाविद्यालयातून उत्तम शिक्षण मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी श्री. रवींद्र कांदळकर, सौ रीना सावंत, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक श्री. श्रीपाद गुरव, श्री. दीपक परब उपस्थित होते. प्रा. डी. व्ही. गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. स्मिता परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.