You are currently viewing भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

 

माझ्या मुलीच्या,प्रियाच्या सासूबाई काल अचानक बोलता बोलता ब्रेन हॅमरेजने गेल्या. शेवटपर्यंत एक *उत्साहमूर्ती* असंच त्यांचं वर्णन करावं लागेलं, मोठी सून, मुलगा कोकणात दोन, तीन दिवसांसाठी गेले होते. माझ्या मुलीची फॅमिली बंगलोरला गेली होती. त्या दोन मोठ्या नातवंडांबरोबर होत्या पण काल होळीचा सण, ८६ व्या वर्षीही त्यांनी स्वतः पुरणपोळ्या केल्या, उलट संध्याकाळी त्यांच्या मोठ्या सुनेची आई व भाऊ सहज भेटायला आले, त्यांनाही आग्रहाने खाऊ घातल्या आणि गप्पा मारता मारता चक्कर येऊन कोसळल्या.

मला आठवतंय १९ वर्षांपूर्वी त्या आपला मुलगा, मोठी मुलगी, मोठी सून यांच्याबरोबर प्रियाला बघायला आल्या होत्या. गोऱ्या, उंच, हसरा चेहरा! अर्ध्या, एक तास गप्पांमध्ये त्यांची नजर स्थिर होती, कुठेही होणाऱ्या सुनेच्या घराकडे फिरती नजर नाही. उलट आपलं कोकणात गेलेलं लहानपण, एक मोठा भाऊ, लहानपणी आई वारल्यामुळे सावत्र भावंडांशीही चांगले संबंध. शेतात सतत काम. पूर्ण निरक्षर, पण मुलं शिकली म्हणून अभिमान. आठ दिर, तीन नणंदा असा सासरचा मोठा गोतावळा. याबद्दलच बोलत होत्या. त्या बोलत असतांना मला कुठेही जाणवलं नाही ही बाई सुनेला पसंद करायला आलीय. उलट माझीच कोणीतरी कोकणातील आत्या, मावशी वाटली.

ती लोकं गेल्यावर इथून होकार मिळावा असं मला वाटलं कारण प्रियाचं लग्न करतांना माझं मत होतं ‘हिला चांगली फॅमिली मिळाली पाहिजे.’ मुलाचा स्वतःचा ब्लॉक पाहिजे ही प्रिया व माझीही अट नव्हती. फक्त एक होतकरू मुलगा पाहिजे एव्हढंच. म्हणूनच रात्री होकार आल्यावर ललित (जावई) बरोबर प्रियाला दिल्लीला जावं लागणार याचा विचार केला नाही, उलट कुटुंबवत्सल फॅमिलीकडून होकार आला म्हणून आनंदाश्रू आले होते.

प्रियाचं लग्न झालं आणि तीन वर्षानी तिच्या सासऱ्यांचा एक पाय गॅंगरीन मुळे कापावा लागला. २००८ ते २०१८ दहा वर्षे त्या माऊलीने त्यांची शारीरिक सेवा केली तीही स्वतःच्या वयाच्या ७० / ८० वयात. तरी पण कुठेही साधी तक्रारीची एक रेषही कपाळावर नाही तर मुखातून दूरच. त्यातूनही त्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमांना वेळेआधी हजर असायच्या. पतिनिधनांनंतर आता गेली सहा वर्षे झाली तरी त्या एक दिवसही निवांत नव्हत्या. टीव्हीवरच्या पाककला बघून त्या दुपारच्या वेळात करणे हा त्यांचा छंद. अशा सतत काम करणाऱ्या हातांची ऊर्जा आपल्यालाही मिळावी असं मला वाटे.

नातवंडांच्या, सुनांच्या, वाढदिवसाला त्यांचं स्वतःच पैशाचं पाकीट असे. अगदी कोणी लग्नाला बोलावलं तरी इतरांनी दिलं तरी त्यांचा स्वतःचा देण्याचा वेगळा हात असे. आपल्या मुलीच्या मुलीच्या (नातीच्या) लग्नात दोन्ही मुलांना सांगितलं, “मामा म्हणून तुमचा आहेर असेलच पण आजी म्हणून नातीला मी माझ्या हातातल्या या दोन सोन्याच्या बांगड्या देणार आहे, जे माझं हक्काचं आहे.” आपल्या हक्काचं जिवंत असेपर्यंत देऊ नये या आजच्या विचारांच्या जगात त्या वेगळ्या होत्या.

गेली चार, पाच वर्षे त्या प्रियाबरोबर दरवर्षी फोंडयात येत असत. सकाळी साडेपाचला उठणे, गार पाण्याने अंघोळ, थोडी योगासने, नंतर बागेत चालणं, झोपलेल्या इतरांना आवाजाची खाटखुटही नसे. बालपण कोकणात गेल्यामुळे झाडांच्या औषधी गुणधर्माची जाण होती. एकदा माझ्या मनगटाची सूज बघून म्हणाल्या, “हात द्या इकडे’, त्यांनी कापूर, तेल यांनी हळुवार मालिश केले. पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या विहिण बाई माझीच सेवा करत होत्या. मनात नात नव्हतं तर सेवा होती. नंतर त्या तेलाची बाटली मला दिली व फोन करून “लावता की नाही.?” हेही विचारायच्या.

प्रियाने सासूबाईंबद्दल एकही नकारात्मक वाक्य आई म्हणून मला सांगितलं नाही त्याचं पूर्ण श्रेय त्यांना होतं. फार *विरळा माणसे* देव अशी बनवतो त्यातल्या त्या होत्या. आपण आता देवाकडे मागतो, “मरण पटकन येऊ देत, लोळणे नको.” मला वाटतं हेसुद्धा त्यांनी देवाकडे मागितलं नसेल कारण काही मागणे हा स्वभावच नाही इतकी संतुष्ट बाई. पण देवाचाही त्या लाडक्या होत्या असतील म्हणूनच न मागणाऱ्या त्या बाईला शांतपणे नेलं.

आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. *शाली वहिनी*, *शाली काकी* यांच्या असंख्य आठवणी त्यांचे दिर, जावा, पुतण्या आज अश्रूभऱ्या नेत्रांनी सांगत होते. *हे जे त्यांनी कमवलं त्यात सहजता होती.* ती पोकळी राहणारच…

आज त्यांच्या लौकिक अर्थाने *अचेतन* असलेल्या शरीराला जेव्हा नमस्कारासाठी स्पर्श केला तेव्हा एक वेगळीच *चेतना* जाणवली ती होती फक्त *निस्वार्थी समर्पणाची..*

 

— सौ. संगीता संभाजी सावंत, डोंबिवली

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =