You are currently viewing सिंधुदुर्गातील लोकांवरच फक्त टोल आकारून अन्याय का ?

सिंधुदुर्गातील लोकांवरच फक्त टोल आकारून अन्याय का ?

नंदन वेंगुर्लेकर यांचा सवाल

 

कणकवली :

 

कणकवली येथे टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांनी “ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग पासिंग झालेल्या सर्व गाड्यांना टोलमुक्ती द्यावी किंवा आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा. हेही शक्य नसल्यास ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याबाहेर हलवा. पण उद्यापासून टोल वसुली केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु”, असा इशारा दिला आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, संजय भोगटे, दीपक बेलवलकर, अनंत पिळणकर, विलास कोरगावकर, दादा कुडतरकर, नितीन म्हापणकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री,कन्हैया पारकर, प्रमोद मसुरकर, कमलेश नरे, उत्तम राणे, सादिक कुडाळकर, लाड आदी उपस्थित होते.

ओसरगांव टोल नाक्यामुळे जिल्हयाचे विभाजन होत आहे. न्यायालय, प्रशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आदीसाठी चार तालुक्यांतील लोकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. टोल बाबत काहिजणाकडून सातत्याने बुद्धिभेद केला जात आहे. तो थांबवावा. आम्ही टोल माफी नव्हे तर टोल मुक्ती मागत आहोत. जिल्हातर्गत प्रवास करताना टोल नको असे आमचे म्हणणे आहे.

याबाबत आतापर्यंत शासन तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदने दिली आहेत. चर्चा केली आहे. आमचा प्रस्ताव, मागणी त्यांच्यासमोर ठेवली आहे. ती मागणी कोणीही झिडकारलेली नाही. उलट सकारात्मकता दाखवत मागणी बाबत विचार सुरु असल्याचेच आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर टोल बाबतचा निर्णय आम्हाला द्यावा. आम्हाला खिंडीत गाठून अन्यायकारक टोल आकारू नये, अशी कृती समितीची भूमिका आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व इतर लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेला शब्द पाळावा. अन्यथा संघर्ष अटळ असून बुधवारी ओसरगाव येथील टोल नाक्यावर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. प्रशासनाने संघर्ष करायला भाग पाडू नये. तसेच आंदोलन चिघळवू नये. या आंदोलनात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही नितीन वाळके यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्गातील लोकांवर अन्याय का? सिंधुदुर्ग वासीयांना टोल मुक्ती मिळत नाही. तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका आम्ही सुरू होऊ देणार नाही. त्यासाठी कोणतीही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल. असा आम्ही समितीच्या माध्यमातून निर्धार केला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात स्थानिक नागरिकांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. त्याबाबत आम्ही माहिती संकलित केली आहे. गोव्यातही तेथील लोकांना टोल मुक्ती देण्यात आली आहे. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवरच फक्त टोल आकारून अन्याय का केला जात आहे? असा सवाल नंदन वेंगुर्लेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

बुधवारी सकाळी १० वाजता ओसरगाव येथील टोल नाक्यावर समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी सिंधुदुर्गवासीयांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा