You are currently viewing कुणकेरी गावचा हुडोत्सव ३० मार्चला

कुणकेरी गावचा हुडोत्सव ३० मार्चला

कुणकेरी गावचा हुडोत्सव ३० मार्चला

सावंतवाडी

तळ कोकणात प्रसिद्ध असलेला कुणकेरी गावचा हुडोत्सव ३० मार्चला संपन्न होत असून २९ मार्चपासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसरांच्या थरारासह भक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी कुणकेरी गावात होणार आहे.

२९ मार्चला दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार असून त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहेत. रात्री ९ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोल ताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे.

३० मार्चला हुडोत्सवाचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार असून याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहेत. सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडे मोडणी व लुटुपुटूचा खेळ होणार असून सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा