देवगड :
विजयदुर्ग पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेरी पोलिस चेक पोस्ट येथे २००० जिलेटीनच्या जिवंत कांड्या ( सुपर ९० ) आणि १००० डेटोनेटर अशी अनुक्रमे ३४००० हजार आणि ११००० रूपये किंमतीचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. विजयदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली. २२ तारखेला सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. देवेंद्रसिंग रतनलाल राठोड (वय २६ वर्षे, रा. भोपालगड, भिलवडा , राजस्थान) व ड्रायव्हर मुकेशकुमार लालूराम पंवार (रा. भिलवडी, राजस्थान) हे त्यांचे XUV 500 आरटीओ नंबर RJ – 06 UD 0377 या चारचाकी वाहनामध्ये तुळसणी, तालुका संगमेश्वर (देवरूख, जिल्हा रत्नागिरी) येथून त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थांच्या गोडाऊनमधून २००० जिलेटीनच्या जिवंत कांड्या आणि १००० डेटोनेटर असे एकूण ४५००० हजार रुपयांचे स्फोटक पदार्थ ब्लास्टींग ट्रेक्टरला देण्यासाठी देवगडला जात असताना बेकायदा विनापरवाना वाहतूक करताना मिळून आल्याने स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजयदुर्ग पोलिस करत आहेत.